नाशिक : उत्तरप्रदेशच्या सत्तेचे सुत्रे पुन्हा ‘समाजवादी’कडे ठेवण्यासाठी अखिलेश यादव प्रयत्नशील आहे. त्यांनी न्यायालयात ‘सायकल’चा दावाही जिंकून ‘सपा’साठी सायकल पुन्हा मिळविली आहे. शहरात मनपाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सपाने केली असली तरी ‘सायकल’ला गती कितपत लाभणार याविषयी प्रश्नचिन्ह कायम आहे. समाजवादी पक्षाने महापालिका निवडणूक लढविणार असल्याचे काही दिवसांपुर्वी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले आहे. तसेच ज्या भागात समाजवादी पक्षाचे प्राबल्य आहे त्या भागातून उमेदवार देण्याचा प्रयत्न राहणार असून उमेदवार देताना यापुर्वी जे समाजवादीचे नगरसेवक म्हणून महापालिकेत निवडुन गेले ते या निवडणूकीत उमेदवार नसणार असल्याचे शहराध्यक्ष इम्रान चौधरी यांनी स्पष्ट केले. यामुळे २००९च्या पंचवार्षिकमध्ये समाजवादी पक्षाकडून महापालिकेत लोकप्रतिनिधित्व करणारे मुशीर सय्यद यांच्यासोबत पक्ष या पंचवार्षिकमध्ये नसणार असल्याचे अप्रत्यक्षरित्या सांगून टाकले. तसेच समाजवादी पक्षापुढे यंदा एआयएमआयएमचेही आव्हान निर्माण झाले आहे. समाजवादी पक्षाकडून या पंचवार्षिक निवडणूकीत वीस जागांवर उम्मेदवार देणार असल्याचे चौधरी यांनी काही दिवसांपुर्वी सांगितले होते. एकूणच चौधरी यांनी पक्षासाठी उमेदवारांचा चाचपणीला सुरूवात केली असून पुढच्या आठवड्यात पक्षाचे आमदार अबु आसिम आजमी हे नाशिकला येत असून महापालिकेच्या निवडणूकीची आखणी तसेच मोठी घोषणा त्यांच्याकडून होण्याची शक्यता आहे. आझमी हे मुलायमसिंग यांच्या जवळचे मानले जातात. सध्या समाजवादीचे सुत्रे अखिलेश यांनी आपल्या हातात घेतली असून ‘सायकल’चा दावाही जिंकला आहे. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीत सायकलसोबत अखिलेश दिसणार असल्याचे निश्चित असले तरी मुलायमसिंग यांना पक्षाच्या प्रचारात कितपत स्थान मिळेल व आजमी यांच्या आगामी नाशिक दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
‘सायकल’ला गती मिळणार ?
By admin | Published: January 23, 2017 7:13 PM