ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 4 - ठाणे शहरात आज अनोख्या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. घराची जबाबदारी सांभाळत कार्यालयाची काम चोखपणे पार पाडणा-या स्त्री-वर्गाने स्वतःच्या स्वास्थासाठी क्षणभर विश्रांती घ्यावी, हा संदेश देण्यासाठी शहरात खास सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या महिलांच्या मराठमोळ्या अवताराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. नऊवारी साडी, नाकात नथ, कपाळावर टिकली आणि पायात स्पोर्ट्स शूज अशा यो मराठी अवतारात महिलांनी रॅलीमध्ये सहभाग नोंदवला. या कार्यक्रमात प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेते मिलिंद सोमण यांची विशेष उपस्थिती होती. गडकरी रंगायतनपासून संपूर्ण ठाणे शहरात रॅली काढून महिलांनी आरोग्यविषयक संदेश यावेळी देण्यात आला.
घरातील काम, ऑफिस काम यामुळे महिलांना स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यायलाही पुरेसा वेळ मिळत नाही. या पार्श्वभूमीवर
रोगांना प्रतिबंध करण्यासाठी योग आणि चालण्यासाठी प्रत्येक महिलेने वेळ काढावा असे आवाहन यावेळी मिलिंद सोमण यांनी केले.