पुढच्या चार दिवसांमध्ये देशभरात मान्सून पुन्हा एकदा तीव्र होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरामध्ये चक्रिवादळाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे १२ राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो, असा इशारा हवामान खात्याने दिली आहे. आंध्र प्रदेश, तेलंगाणा आणि ओदिशामधील काही काही भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तेलंगाणामध्ये पुढचे तीन दिवस लोकांनी कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, असा सल्ला देण्यात आला आहे. उत्तर भारतामध्येही पर्वतीय क्षेत्रांमध्ये पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. पुरामुळे दिल्लीत यमुना नदीची पाणी पातळी ही धोक्याच्या पातळीच्या वर आहे. तसेच गंगा नदीमध्येही पाणी पातळी वाढली असून, त्यामुळे उत्तर प्रदेशातील अनेक भागांमध्ये पुराचा धोका वाढला आहे.
मुंबईतही मुसळधार पावसामुळे सोमवारी जनजीवन विस्कळीत झालेलं होतं. हमामान विभागाने मंगळवारसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. हवामान विभागाने सांगितलं की, बंगालच्या उपसागरामध्ये एक चक्रिवादळ तयार होत आहे. ते पश्चिम, मध्य आणि त्याला लागून असलेल्या उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरावर कायम आहे. हे चक्रिवादळ समुद्र सपाटीपासीन ५.८ ते ७.६ किमी वर आहे. त्यामुळे २४ तासांत येथे कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे तेलंगाणा, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकचा किनारी भाग येथे मुसळधार पाऊस पडू शकतो, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. येथे एकूण ११५.६ मिलिमीटर ते २०४.४ मिलिमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर हिमाचल प्रदेश, राजस्थानचा पूर्व भाग, पश्चिम मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, अंदमान निकोबार, मराठवाडा, किनारी आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय, तेलंगाणा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू आणि पुदुच्चेरीमध्येही पावसाची शक्यता आहे. यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो.