पालघर, रायगडला चक्रीवादळाची धडकी; केरळ, गुजरातसह राज्यात सतर्कतेचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 07:24 AM2021-05-15T07:24:47+5:302021-05-15T09:41:04+5:30
भारतीय हवामान खात्याच्या राष्ट्रीय हवामान अंदाज केंद्राकडून पुढील पाच दिवसांसाठीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुंबई : अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता चक्रीवादळात होत असून, तौऊते हे चक्रीवादळमहाराष्ट्राच्या किनारी भागातून पुढे सरकत गुजरातहून पाकिस्तानला धडकेल. तत्पूर्वी त्याचा प्रभाव महाराष्ट्राच्या किनारी जाणवेल. परिणामी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड व मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. कोकण किनारी मुसळधार पाऊस पडेल. १५ मे रोजी गोवा, कोकणातील काही ठिकाणी व विदर्भात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे, असा अंदाज भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवला.
भारतीय हवामान खात्याच्या राष्ट्रीय हवामान अंदाज केंद्राकडून पुढील पाच दिवसांसाठीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यानुसार, १५ मे रोजी गोवा, कोकणातील काही ठिकाणी व विदर्भात काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडेल. गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. १६ मे रोजी गोवा, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. गोवा आणि दक्षिण महाराष्ट्र किनारपट्टीवर ७० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील. १७ मे रोजी गोवा, कोकणातील काही ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल.
महाराष्ट्र आणि गोव्याच्या किनाऱ्यावर या चक्रीवादळाचा प्रभाव १५, १६ आणि १७ मे रोजी जाणवेल. महाराष्ट्र किनारपट्टीवर वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. १६ व १७ मे रोजी मुंबई, ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यांत बहुतांश ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळतील. समुद्र खवळलेला राहील. तासी ६० ते ७० किमी वेगाने वारे वाहतील. - शुभांगी भुते, शास्त्रज्ञ, मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग