Cyclone Nisarga : "नागरिकांनी घरात थांबावे, सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा", अजित पवारांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2020 12:10 PM2020-06-03T12:10:16+5:302020-06-03T12:14:59+5:30
Cyclone Nisarga :
मुंबई : अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ आज दुपारपर्यंत महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीवर धडकणार आहे. त्यामुळे किनारपट्टी भागात असलेल्या नागरिकांनी घरात थांबावे आणि सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून केले आहे.
अजित पवार म्हणाले, "‘निसर्ग’ चक्रीवादळ विशेषत: अलिबाग, पालघर परिसरात धडकण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह किनारपट्टीवरील नागरिकांनी घरातच किंवा सुरक्षित ठिकाणी आसरा घेऊन थांबावं. वादळाचा जोर ओसरेपर्यंत बाहेर जाऊ नये."
आरोग्य यंत्रणा, स्थानिक प्रशासनही दक्ष आहे. राज्याची यंत्रणा संपूर्ण तत्पर असून आवश्यकतेनुसार तत्काळ मदत उपलब्ध करण्याचं नियोजन झालं आहे. या वादळाचा वेग आणि ताकद मोठी असल्यानं नागरिकांनी सावध व सुरक्षित रहावं तसंच प्रशासनाच्या सुचनांचं पालन करावं, असं आवाहन करतो.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) June 3, 2020
याचबरोबर, चक्रीवादळापासून जीवितहानी, वित्तहानी होऊ नये म्हणून प्रशासनाने संपूर्ण दक्षता घेतली आहे. आवश्यकतेनुसार नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. लाईफगार्ड, पोलिस, अग्निशमन दल, एनडीआरएफचे जवान सज्ज आहेत, अशी माहिती अजित पवारांनी दिली.
आरोग्य यंत्रणा, स्थानिक प्रशासनही दक्ष आहे. राज्याची यंत्रणा संपूर्ण तत्पर असून आवश्यकतेनुसार तत्काळ मदत उपलब्ध करण्याचे नियोजन झाले आहे. या वादळाचा वेग आणि ताकद मोठी असल्याने नागरिकांनी सावध व सुरक्षित रहावे. तसेच प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.
दरम्यान, अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे निर्माण झालेले निसर्ग चक्रीवादळ कोकण किनारपट्टीकडे कूच करीत आहे. या निसर्ग चक्रीवादळाचा वेग वाढला असून दुपारी अलिबाग किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण कोकण पट्टा आणि दमण, गुजरात वेगाने वारे वाहत आहेत. मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यांत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.