मनोहर कुंभेजकर,
मुंबई-घाटकोपर(प) येथील भटवाडीतील येथील गणेश मंदिरसमोरील सुगंधाबाई वाल्मिक नंद चाळ येथील खोली क्र. ३ मध्ये राहणाऱ्या अलका भास्कर सोनावणे यांच्या सतर्कतेमुळे आणि त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे त्यांच्या घरातील गॅस सिलिंडरच्या गळतीमुळे होणारा स्फोट टळला आहे, अन्यथा दामूनगरसारखी घटना घडली असती, अशी माहिती येथील नागरिकांनी दिली.भास्कर सोनावणे यांच्या घरात ११ मे रोजी सिलिंडर आला. घरातील गॅस संपल्यामुळे त्यांनी १२ मे रोजी सायंकाळी ५.४५च्या सुमारास गॅस सिलिंडर बसवण्यासाठी बाहेर काढला असता, गॅस सिलिंडरच्या खालच्या भागातून आवाज येऊन गॅस गळती सुरू झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी आरडाओरड सुरू केली. त्यांचा मुलगा अशोक सोनावणे कामावरून घरी येताच, त्याने वायू गळती झालेला सिलिंडर घराबाहेर बाहेर काढला. शेजाऱ्यांच्या सल्ल्यानुसार सिलिंडर पाण्याच्या बादलीत उभा ठेऊन त्यावर साबणाचा मारा केला. गॅसगळतीचे प्रमाण वाढतच होते. या प्रकाराची तक्रार विक्रोळी अग्निशमन केंद्राकडे करण्यात आली. ३०-३५ मिनिटांनी फायरब्रिगेडची गाडी आली. त्यांच्या जवानांनी सिलिंडर गणेश मंदिराच्या पटांगणात नेला. त्यावर पाण्याचा मारा करून सिलिंडर वायुगळतीमुक्त केला. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सोनावणे यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाचे कौतुक केले.‘मोठी घटना घडली असती आणि माझ्या कुटुंबीयाचे बरेवाईट झाले असते, तर त्याला जबाबदार कोण?’ असा सवाल अशोक सोनावणे यांनी केला आहे. अशी घटना पुन्हा घडू नये, तसेच संबंधित गॅस एजन्सीचे असहकार्य आणि संबंधित गॅस कंपनीने सदोष सिलिंडर पुरवल्याबद्दल त्यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. (प्रतिनिधी)