मुंबई : भारताचा १८ वर्षीय बुद्धिबळपटू डी गुकेश FIDE वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२४ स्पर्धेचा विजेता ठरला आहे. गुकेशने चायनीज ग्रँडमास्टर डिंग लिरेनचा पराभव करत हा खिताब पटकावला आहे. विश्वनाथन आनंदनंतर गुकेश आता भारताचा दुसरा विश्वविजेता ठरला आहे. गुकेशची कामगिरी ही भारतीयांसाठी अभिमानास्पद असून त्याच्यावर देश-विदेशातून कौतुकाचा वर्षाव व्हायला लागला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील गुकेशच्या खेळाचं कौतुक करत महाराष्ट्रासाठी मोठी इच्छा व्यक्त केली.
राज ठाकरेंनी एक्सवर ट्विट करत गुकेशला शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, "भारतीय बुद्धिबळपटू डी गुकेश याने आज शब्दशः इतिहास घडवला आहे. वयाच्या अठराव्या वर्षी जगज्जेता डिंग लिरेनला हरवत गुकेश विश्वविजेता ठरला आहे. डी गुकेश याचं, त्याच्या कुटुंबीयांचं आणि त्याचे प्रशिक्षक यांचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मनःपूर्वक अभिनंदन. कला, विज्ञान आणि खेळ यांचा अद्वितीय संगम असलेला बुद्धिबळाचा हा खेळ भारतात, महाराष्ट्रात वृद्धिंगत होऊ दे आणि जगजेत्यांची एक मोठी परंपरा हिंदुस्थानात निर्माण होऊ दे हीच इच्छा."
दरम्यान, सिंगापूर येथे झालेल्या FIDE वर्ल्ड चॅम्पियनशिप २०२४ स्पर्धेत गुकेशने चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून विजेतेपद पटकावले. यासह गुकेश बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वात तरुण विश्वविजेता ठरला आहे. गुरुवारी, १२ डिसेंबर रोजी चॅम्पियनशिपच्या शेवटच्या फेरीत दोघांमध्ये चुरशीची स्पर्धा रंगली, पण अखेरला गुकेशने सामना आपल्या नावावर केला. गुकेशने चिनी ग्रँडमास्टरचा पराभव करत ७.५- ६.५ अशा फरकाने विजेतेपद पटकावले.विशेष म्हणजे, २०१८ साली सलग १०८ दिवस न हरता खेळण्याचा पराक्रम लिरेनने केला होता, अशा खेळाडू पराभूत करत गुकेशने जागतिक स्तरावर नवी ओळख निर्माण केली आहे.