पुणे, दि. 8 - प्रसिद्ध उद्योजक डी. एस. कुलकर्णी यांनी डी. एस. कुलकर्णी डेव्हलपर्स लिमिटेड या कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांचे चिरंजीव शिरीष कुलकर्णी यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. कंपनीच्या संचालकपदी शशांक बी. मुखर्जी यांचीही नेमणूक करण्यात आली आहे.
डीएसके समूहातील डीएसकेडीएल या कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक गुरुवारी पुण्यात झाली. या वेळी हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीतर्फे मुंबई स्टॉक एक्स्चेंज व नॅशनल स्टॉक एक्स्चेंजला अधिकृतरित्या कळविण्यात आले. डी. एस. कुलकर्णी अकार्यकारी अध्यक्ष म्हणून कंपनीत कार्यरत राहणार आहेत. बँकिंग क्षेत्रात ४४ वर्षांचा अनुभव असलेल्या शशांक मुखर्जी यांची कंपनीच्या संचालक मंडळावर नियुक्ती करण्यात आली. त्यासाठी कंपनीच्या वित्त समितीचीही पुनर्रचना करण्यात आल्याचे या पत्रात म्हटले आहे.
कंपनीच्या अध्यक्ष व मुख्य वित्त अधिकारी हेमंती कुलकर्णी यांच्या स्वाक्षरीने हे पत्र मुंबई स्टॉक एक्स्चेंजला पाठविण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांत गुंतवणूकदारांचे पैसे न दिल्याने तसेच कर्मचा-यांचे वेतन थकल्याने डीएसके उद्योगसमूह वादाच्या भोव-यात सापडला आहे.