पुणे : डी. एस. कुलकर्णी यांचा बुधवारी रात्री अपघात झाल्यानंतर त्यांना निगडी येथील लोकमान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. दरम्यान, सकाळी प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर कुलकर्णी यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात हलवण्यात आले. रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी याबाबत माहिती दिली. कुलकर्णी यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉ. केळकर यांनी सांगितले. डॉ. केळकर म्हणाले, ‘‘कुलकर्णी यांना अपघाता वेळी मार लागला असून डाव्या बाजूच्या दोन बरगड्या फ्रॅक्चर आहेत. मात्र, यासाठी कोणत्याही शस्त्रक्रियेची गरजेच्या नसून हे फ्रॅक्चर कालांतराने भरून येईल. याबरोबर चेहऱ्याला काही प्रमाणात मुकामार लागला; मात्र तोही भरून येण्यासारखा आहे.’’ गुरुवारी डीएसके यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले असून, शुक्रवारी जनरल वॉर्डमध्ये हलविण्यात येईल. शनिवारी डीएसकेंना घरी सोडण्यात येणार असून, आता ते उपचारांना उत्तम प्रतिसाद देत आहेत. त्यांना सर्व अन्नपदार्थ खाण्याची परवानगी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर मर्यादीत वेगापेक्षा अतिवेगाने वाहने चालविली जातात. त्यामुळे याठिकाणी योग्य उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.माझी प्रकृती चांगलीबुधवारी मध्यरात्री झालेल्या अपघातातून मी सुखरूप बचावलो असून माझ्या बरगड्यांना थोडा मार लागला आहे. मात्र, या अपघातात माझा २२ वर्षांपासूनचा सहकारी नीरज याचा मृत्यू झाला. माझी प्रकृती गंभीर असल्याच्या अफवा सोशल मीडियातून पसरविल्या जात आहेत. ते वाचून चौकशी करणारे अनेक फोन व मेसेज येत आहेत. या अफवांमध्ये काहीच तथ्य नाही. मी सुखरूप असून, येत्या ७ ते ८ दिवसांत पूर्ण बरा होईन. माझी प्रकृती चांगली आहे. पूर्ण बरा झाल्यानंतर माझे पहिले काम असेल, ते एक्सप्रेस-वेवरील अपघातांचे प्रमाण कमी करणे. हे अपघात कमी करण्यासाठी मी लढा उभारणार आहे, असे बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी सांगितले.
डी. एस. कुलकर्णी यांची प्रकृती धोक्याबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2016 4:53 AM