नवी मुंबई : नेरूळमधील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाची नोंदणी पालिकेने ४ सप्टेंबरला रद्द केली होती. यानंतरही रुग्णालय सुरू असल्यामुळे त्यांच्याविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नोंदणीच नसल्याने रुग्णांनीही त्या रुग्णालयामध्ये दाखल होऊ नये, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. बॉम्बे नर्सिंग होम रजिस्ट्रेशन (सुधारित)कायदा २००५ कलम ३ अन्वये प्रत्येक रुग्णालयाने महानगरपालिकेचे नोंदणी प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. नियमाप्रमाणे नोंदणी प्रमाणपत्राचे नूतनीकरण करणेही आवश्यक आहे. डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाचे डीन डॉ. शिरीष पाटील यांनी ३१ मार्च २०१६ रोजी पुनर्नोंदणीसाठी अर्ज केला होता. परंतु त्यांच्याकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र नव्हते. याशिवाय महापालिकेची थकबाकी व अग्निशमन दलाचे प्रमाणपत्र नव्हते.यामुळे त्यांना ३० मे २०१६ रोजी सुनावणीसाठी पत्र पाठविण्यात आले होते. सुनावणीदरम्यान त्यांच्याकडे अपूर्ण कागदपत्रांची पूर्तता करण्यास सांगण्यात आले होते.१३ जूनला सुनावणीदरम्यान आवश्यक कागदपत्रांची पूर्तता संबंधितांनी केली नाही. यामुळे ३० सप्टेंबरला रुग्णालयाचा पुनर्नोंदणीसाठीचा अर्ज रद्द करण्यात आला. या निर्णयानंतर नियमाप्रमाणे व्यवस्थापन एक महिन्यामध्ये शासनाच्या आरोग्यविभागाकडे जाऊन रीतसर परवानग्या मिळवू शकते. पण रुग्णालय व्यवस्थापनाने अशाप्रकारे कोणतीही कार्यवाही केली नाही. रुग्णालयाचे जनसंपर्क अधिकारी व उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. श्याम मोरे यांच्याशी संपर्क साधला, परंतु रुग्णालयाच्यावतीने प्रतिक्रिया उपलब्ध होवू शकली नाही. (प्रतिनिधी)
डी. वाय. पाटील रुग्णालयावर गुन्हा
By admin | Published: November 17, 2016 4:14 AM