पुणे/कोल्हापूर : डॉ. डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेच्या पिंपरी चिंचवड व कोल्हापूर येथील कार्यालयांवर प्राप्तिकर विभागाने बुधवारी छापे टाकले. पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलात सकाळी साडेसातलाच प्राप्तिकर विभागाचे पथक धडकले. त्यांनी संस्थेच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या कागदपत्रांची छाननी सुरू केली. या छाप्यामुळे शैक्षणिक संकुल आणि परिसरातील वातावरण बदलून गेले. दहा खासगी वाहनांचा ताफा घेऊन आलेल्या २० अधिकाऱ्यांच्या पथकाने पोहोचल्यानंतर संस्थेची महत्त्वाची कार्यालये बंद केली. विद्यापीठाचे कार्यालय, तसेच वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता कार्यालय आदी ठिकाणी अधिकाऱ्यांनी कागदपत्रे तपासणीसाठी ताब्यात घेतली. कर्मचाऱ्यांपैकी काहींना कार्यालयाबाहेर पडू दिले नाही, तसेच बाहेरच्यांना आत येण्यास मज्जाव केला. कोल्हापूर येथील संस्थेचे प्रमुख डॉ. संजय डी. पाटील यांच्या ‘ज्ञानशक्ती’ व ‘यशवंत’ या दोन निवासस्थानांसह डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल व इंजिनीअरिंग कॉलेज, फार्म हाउस आदींसह इतर ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले. रात्री उशिरापर्यंत कागदपत्रांची कसून तपासणी करण्यात आली. छापे टाकलेल्या ठिकाणी मोठा पोलीस फौैजफाटा तैनात होता. (प्रतिनिधी)
डी. वाय. पाटील संस्थेवर प्राप्तिकर विभागाचे छापे
By admin | Published: July 28, 2016 12:59 AM