ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 1 - माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष तथा माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील वय ८१ असले तरी तरुण उत्साहाने ते कसे काम करतात. याची झलक गुरुवारी सोलापूकरांना पाहावयास मिळाली. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ४ सप्टेंबर रोजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याहस्ते त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. डी. वाय. पाटील हे सत्कार सोहळ्याच्या तयारी निमित्ताने गुरूवारी सोलापुरात दाखल झाले. पार्क मैदानावर उभारण्यात येणाऱ्या शामियानाची त्यांनी पाहणी केली. व्यासपीठ, निमंत्रित व नागरिकांची सोय याबाबत त्यांनी बारकाईने पाहणी केली. मध्येच काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुधीर खरटमल, प्रकाश यलगुलवार हे त्यांच्या कानाजवळ जाऊन माहिती पुरवित होते.दुपारी चार वाजता त्यांचे हॉटेल त्रिपुरसुंदरीमध्ये आगमन झाले. गाडीतून उतरून सभागृहकडे जाताना त्यांच्यातील उत्साह तरुणांना लाजविणारा होता.
अंगातील पिवळसर राखाडी रंगाच्या जॅकेटमुळे त्यांच्या रुबाबात आणखीन भर पडल्याचे दिसत होते. चेहऱ्यावर उत्साह अन आत्मविश्वास यामुळे त्यांचे व्यक्तीमत्त्व आणखीन खुलल्याचे दिसत होते. पत्रकारांशी त्यांनी अत्यंत दिलखुलासपणे संवाद साधला. आयुष्यातील अनेक गोष्टींच्या आठवणी अन सुशीलकुमार शिंदे यांच्याबरोबर गुंफलेले मैत्रीचे धागे सांगितले. डिफरंट बॉडीज बट...डॉ. डी. वाय. पाटील यांनी शिंदे आणि त्यांच्या मैत्रीचे नाते सांगताना डिफरंट बॉडीज बट वन सोल असे म्हणत सुशीलमैत्रीचे गूढरहस्य उलगडले. सुशीलकुमार इज नेपोलियन आॅफ नेशन असा त्यांनी उल्लेख केला. १९७४ मध्ये तायप्पा सोनवणे यांची जागा रिकामी झाल्यावर सुशीलकुमार यांनी निवडणूक लढविली. पुढे लगेच मंत्री झाले. तेव्हापासून आमच्यात मैत्री झाली. पुढे मला तिकीट मिळविताना खूपच त्रास झाला. मला थापा मारण्याचे जमत नाही. त्यामुळे राजकारण सोडण्याचा मी निर्णय घेतला. पण विद्यापीठ व इतर कारणांने आमची मैत्री घट्ट राहिली. मला राज्यपाल करण्यात शिंदे यांचा वाटा मोठा असल्याचे त्यांनी नमूद केले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भेटीचा किस्साही त्यांनी यावेळी आवर्जुन कथन केला. हायकमांडचे असेच असते...मला कर्नाटक व कर्नाटकच्यांना बिहारचे राज्यपाल व्हायचे होते. पण काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मला त्रिपुराचे राज्यपाल केले तर बिहारसाठी इच्छुक असणाऱ्यांना कर्नाटकचे केले. सोयीची जागा द्यायची नाही, हायकमांडचे हे असेच असते आणि ही प्रथा सर्व पक्षात आहे, असा गमतीदार किस्सा डॉ. डी. वाय. पाटील यांनी सांगितला. पण राज्यपाल सुशीलकुमार यांच्यामुळेच झालो. ते त्रिपुरालाही आले. उर्जामंत्री असताता त्यांनी या ठिकाणी ६00 मेगॅवॅटचे दोन पॉवर प्रोजेक्ट उभारले. या कार्यक्रमासाठी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, पी. चिदंबरम आले. त्यामुळे आजही त्रिुपरातील जनता सुशीलकुमार यांचे नाव घेते. पंतप्रधानाचे स्वप्न पूर्ण व्हावे.१९ महिने चाललेल्या अमृत महोत्सवाच्या नियोजनात अनेकांनी योगदान दिले. हा सोहळा यशस्वी होण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे, शहर अध्यक्ष सुधीर खरटमल, प्रदेश सरचिटणीस प्रकाश यलगुलवार, माजी खासदार धर्मण्णा सादूल, माजी आमदार निर्मलाताई ठोकळ यांचा मोलाचा वाटा आहे. भविष्यात पंतप्रधान होण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण व्हावे, अशी सदिच्छा, डॉ. डी. वाय. पाटील यांनी व्यक्त केली.