लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : आपला संयत स्वभाव आणि आक्रमक प्रशासकीय निर्णयाकरिता ओळखले जाणारे ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांचे रौद्ररूप गुरुवारी ठाण्यातील नागरिकांनी पाहिले. गावदेवी भागातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या उपायुक्त संदीप माळवी यांच्यावर बुधवारी रात्री झालेल्या हल्ल्यामुळे संतापलेल्या जयस्वाल यांनी या परिसरातील सर्वच गाळे तोडून टाकण्याचे आदेश दिले. टी. चंद्रशेखर आयुक्त असताना रस्ता रुंदीकरणानंतर खुद्द महापालिकेने पुनर्वसन केलेल्या गाळेधारकांवर संतापाच्या भरात कारवाई केली गेली. आयुक्तांच्या दबंगगिरीतून रिक्षा युनियनचे अध्यक्षदेखील सुटले नाहीत. खुद्द जयस्वाल व त्यांच्या सुरक्षारक्षकांनी बेशिस्त रिक्षाचालकांना केलेल्या मारहाणीनंतर स्टेशन परिसरातील रिक्षाचालकांनी बंद पुकारला.बुधवारी सायंकाळी गोखले रोडवरील फेरीवाल्यांवर कारवाई केल्यानंतर पालिकेचे उपायुक्त माळवी यांनी आपला मोर्चा गावदेवी येथील फेरीवाल्यांकडे वळवला. येथील एकवीरा पोळीभाजी केंद्राच्या मालकाने आपला पैशांचा गल्ला बाहेर काढला होता. त्याला तो आत घेण्यास माळवी यांनी सांगितल्यानंतर वाद उफाळून आला. या वेळी माळवी यांचा पोळीभाजी केंद्रावर आलेल्या ग्राहकांशीही वाद झाल्याचे समजते. त्यानंतर, फेरीवाले व काही नागरिक यांनी माळवी यांना बेदम मारहाण केली. जमावाच्या ताब्यातून त्यांना एका पोलीस कर्मचाऱ्याने कसेबसे बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर येथील खाजगी रुग्णालयात उपाचार सुरू असून गुरुवारी अतिदक्षता विभागातून त्यांना सामान्य कक्षात हलवण्यात आले आहे. याप्रकरणी अटकेत असलेल्या देशपांडे पितापुत्राला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.या घटनेचे तीव्र पडसाद गुरुवारी सकाळपासून उमटले. आयुक्त जयस्वाल यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. त्यामध्ये माळवी यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. यापुढे मी स्वत: या भागात रोज पाहणी करून येथे एकही फेरीवाला बसू देणार नसल्याचा इशारा जयस्वाल यांनी दिला होता. फेरीवाल्यांच्या विरोधातील कारवाई आणखी तीव्र करण्याचे आदेशही त्यांनी दिले. त्यानंतर, सायंकाळी ४ च्या सुमारास पालिकेचे अतिक्रमण विभागाचे पथक गावदेवी येथे पोलीस बंदोबस्तात दाखल झाले. या वेळी येथील सर्वच गाळे बंद होते. तसेच आजूबाजूच्या दुकानदारांनीदेखील आपली दुकाने बंद ठेवली होती. सुरुवातीला अतिक्रमण विभागाने एकवीरा पोळीभाजी केंद्रातील सर्व साहित्य जप्त केले. त्यानंतर, त्यांनी केलेले अतिक्रमण पाडून हा गाळा सील केला. त्यानंतर, आजूबाजूचे गाळेदेखील सील करण्यात आले. परंतु, काही वेळातच बाजूच्या गाळ्यांचे सील काढण्यात आले. मात्र, येथील पाण्याच्या टाक्या काढण्यात आल्या. कारवाई आटोपून पथक पुन्हा माघारी निघत असतानाच आयुक्त जयस्वाल घटनास्थळी दाखल झाले. १० ते १५ मिनिटे त्यांनी या भागाची पाहणी केल्यानंतर येथील सर्वच गाळे तोडण्याचे आदेश दिले. लागलीच अतिक्रमण विभागाच्या पथकाने पोकलेनच्या साहाय्याने गाळे तोडण्याची कारवाई सुरू केली. अचानक आपले गाळे जमीनदोस्त होताना पाहून हादरलेल्या गाळेधारकांनी आतील साहित्य बाहेर काढण्याकरिता धावाधाव सुरू केली. त्यांना पोलीस व आयुक्तांसोबत असलेल्या बाउन्सर्सनी प्रसाद दिला. काही गाळेधारकांनी जयस्वाल यांना भेटून ‘साहेब, आमची काय चूक आहे. आमची दुकाने का तोडता’, अशी विनंती करताच आयुक्तांनी ‘हमारे आदमी को मारा, तब तुम कहा थे’, असे सुनावत कारवाई थांबणार नाही, असे निक्षून सांगितले. येथील तब्बल ३० गाळ्यांवर अतिक्रमण विभागाने हातोडा टाकला. टी. चंद्रशेखर आयुक्त असताना ठाण्यात झालेल्या रस्ता रुंदीकरणाच्या वेळी कायदेशीर असलेल्या परंतु रुंदीकरणाच्या आड येणाऱ्या गाळेधारकांचे येथे पुनर्वसन केले होते. त्यामुळे आता संतापाच्या भरात केलेल्या या कारवाईचे न्यायालयात महापालिका कसे समर्थन करणार, असा सवाल गाळेधारक करीत आहेत. समोरील दुकानदारालादेखील आयुक्तांनी सज्जड दम भरला. त्यावर आपले दुकान कायदेशीर असल्याचे त्या दुकानदाराने सांगताच आमच्या माणसाला मारले, तेव्हा तू काय करत होता, असे जयस्वाल यांनी त्या दुकानदाराला सुनावले. बेकायदा फेरीवाले व रिक्षावाले यांना वठणीवर आणलेच पाहिजे. मात्र, त्याकरिता जयस्वाल यांच्यासारख्या ठाणेकरांच्या आदरास पात्र ठरलेल्या अधिकाऱ्याने भावनेच्या भरात दबंगगिरी न करता नियमानुसार कारवाई करावी, असे पालिकेतील लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे.
ठाणे पालिका आयुक्तांची दबंगगिरी
By admin | Published: May 12, 2017 1:49 AM