मुंबई : प्रिन्स विल्यम्स आणि त्यांची पत्नी प्रिन्सेस केट मिडलटन हे ब्रिटनचे शाही दाम्पत्य भारत दौऱ्यावर येणार असून, १० एप्रिल रोजी हे दाम्पत्य मुंबईत येत आहे. या वेळी डबेवाल्यांच्या वतीने महाराष्ट्रीय ठेवा म्हणून प्रिन्सेस केटला साडी-चोळी भेट देण्यात येणार आहे.मुंबईचे डबेवाले व ब्रिटनचे शाही घराणे यांचे भावनिक नाते आहे. त्यामुळे मुंबईला भेट देणाऱ्या या शाही दाम्पत्याचे स्वागत डबेवाले करणार आहेत. विल्यम्स यांचे वडील प्रिन्स चार्ल्स डबेवाल्यांना भेटायला मुंबईला आले होते. त्यांनी डबेवाल्यांची भेट घेऊन आस्थेने या व्यवसायाविषयीही जाणून घेतले होते.प्रिर्न्स चार्ल्स यांच्या भेटीनंतर डबेवाल्यांचे विश्व पालटले. मुंबईकर डबेवाल्यांची ओळख जगाच्या कॅनव्हासवर आली. शिवाय, लग्नसोहळ्यासाठी डबेवाल्यांना आमंत्रण देऊन त्यांनी लंडनचा मानही दिला होता. त्या वेळी डबेवाल्यांचे दोन प्रतिनिधी लंडनला गेले होते. (प्रतिनिधी)
डबेवाले प्रिन्सेस केटला साडी-चोळी भेट देणार
By admin | Published: April 04, 2016 2:19 AM