ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ - दाभोळ येथील गॅसवरील विद्युत निर्मितीचा प्रकल्प कार्यान्वित करण्याचा निर्णय राज्यमंत्रिमंडळाने घेतला असून १ नोव्हेंबरपासूनच हा प्रकल्प सुरू होईल अशी शक्यता आहे. १२ हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पाची विद्युत निर्मिती व एलएनजी अशी विभागणी करण्यात येणार असून त्यासाठी केंद्राची मंजुरी मिळवण्यात येईल अशी माहिती आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या अनेक महत्त्वाच्या निर्णयांपैकी हा एक मानण्यात येत असून राज्यातील वीजनिर्मितीला प्रोत्साहन देण्याचा आणि त्यासंदर्भातील सर्व अडथळे दूर करण्याचा निश्चय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार सध्या या कंपनीच्या डोक्यावर ७,८०० कोटी रुपयांचे कर्ज असून यापैकी ३००० कोटी रुपये रत्नागिरी एलएनजी या नव्या कंपनीच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहे.