नवी दिल्ली : डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंदराव पानसरे आणि प्रा. कलबुर्गी या तिघांच्याही खून प्रकरणात एकाच प्रकारचे पिस्तूल वापरले गेल्याचा नवा पुरावा कर्नाटक सीआयडी कडून पुढे आला आहे, या पार्श्वभूमीवर दाभोलकर, पानसरे व कलबुर्गी हत्याकांडांची चौकशी करणाऱ्या यंत्रणा अनुक्रमे सीबीआय, सीआयटी आणि कर्नाटक सीआयडी अशा तीनही यंत्रणांच्या तपासकार्यात सूसूत्रता आणि वेग हवा. ही तातडीची गरज आहे अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे अध्यक्ष अविनाश पाटील यांनी वूमन्स प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली.दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी या तिघांचेही खून व्यक्तिगत वैरातून अथवा कौटुंबिक कलहातून झाले नाहीत तर तिन्ही व्यक्ती वैचारिक मतभिन्नतेच्या बळी आहेत. तिन्ही खुनांची पार्श्वभूमी समान आहे, आजवर मिळालेल्या पुराव्यातून हेच सत्य सामोरे आले आहे, मग या तिघांनाही सातत्याने विरोध करणाऱ्या संघटना आणि गटांच्या चौकशीसाठी तपास यंत्रणांना इतका वेळ का लागतो आहे? असा सवाल उपस्थित करीत डॉ. हमीद दाभोलकर म्हणाले, पानसरे खून खटल्यात सनातन संस्थेच्या समीर गायकवाड विरूध्द आरोपपत्र दाखल झाले आहे. गायकवाडचे संबंध नेमके कोणा कोणाशी होते, याचा कसोशीने शोध तपास यंत्रणांनी घेतल्यास, ज्यांच्या विरोधात मडगाव बॉम्बहल्ला प्रकरणी आंतरराष्ट्रीय रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे, ते सनातन संस्थेचे रूद्र पाटील, सारंग अकोलकर, जयप्रकाश हेगडे व प्रवीण लिंबकर अशा चार जणांची नावे समोर येतील. चौथ्या बुद्धिप्रामाण्यवादी व्यक्तीचा बळी जाण्याआधी तपास यंत्रणांनी या संशयितांना त्वरित जेरबंद केले पाहिजे, असे दाभोलकर म्हणाले.कॉम्रेड पानसरेंच्या स्नुषा प्रा. मेघा पानसरे म्हणाल्या, दाभोलकरांच्या हत्येला ३0 महिने उलटले. पानसरेंच्या हत्येला २0 फेब्रुवारी रोजी १ वर्ष पूर्ण होईल, तर प्रा. कलबुर्गींच्या हत्येला ५ महिने पूर्ण होतील. तिघांच्याही मारेकऱ्यांना आजवर अटक झालेली नाही. उलट या खुनांबाबत ज्या संस्थांवर संशय व्यक्त होतो आहे, त्यांना महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षाकडून अप्रत्यक्ष पाठिंबा मिळतांना दिसतो आहे. आम्ही अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या वतीने दिल्लीत जंतर मंतरवर धरणे धरले तर आम्हाला विरोध करण्यासाठी तिथे संशयित संस्थांचे लोक आमच्यावर उघडपणे प्रत्यारोप करण्यासाठी दाखल होतात. लोकशाही व्यवस्थेत चिंता वाटावी अशीच ही बाब आहे. सरकार नावाची व्यवस्था देशात अस्तित्वात आहे की नाही, असा प्रश्न अशावेळी पडतो.शीना बोरा केससाठी सीबीआयने ४ पथके, तर व्यापमं चौकशीसाठी ४0 पथके नियुक्त केली. दाभोलकरांच्या तपासासाठी मात्र सीबीआयचे अवघे ४ अधिकारी आहेत. त्यांच्या तपास कार्यातही सुसूत्रता दिसत नाही. दाभोलकर आणि पानसरेंचे खून मॉर्निंग वॉकच्या वेळी झाले असल्याने महाराष्ट्र अंनिसच्या वतीने दर महिन्याच्या २0 तारखेला ‘निर्भय मॉर्निंग वॉक’ आयोजित केला जातो. आमचे म्हणणे ऐकून तरी घ्या, यासाठी पंतप्रधान मोदी व महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची दर महिन्याला आम्ही भेटीसाठी वेळ मागतो. मात्र आजतागायत आम्हाला एकदाही ना भेटीची वेळ मिळाली ना आमच्या एकाही पत्राचे उत्तर मिळाले, असे अंनिसचे अध्यक्ष पाटील म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)परस्पर विरोधी संघटनांचे जंतर मंतरवर धरणेदिल्लीत दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी खुनांच्या तपासातील दिरंगाईचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीने पत्रपरिषदेआधी प्रतीकात्मक धरणे प्रदर्शन आयोजित केले होते. दिल्लीतल्या समविचारी संघटना व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते या धरण्यात सहभागी होते तर दुसरीकडे अंधश्रध्दा निर्मूलन समितीवर प्रत्यारोप करण्यासाठी तसेच धरण्यांना विरोध दर्शवण्यासाठी हिंदू जनजागरण समिती व सनातन संस्थेच्या मोजक्या १0/१५ कार्यकर्त्यांनी बॅनर लावून जंतर मंतरवर प्रति धरणे धरले. सरकारचा निषेध करणाऱ्या अंनिस सारख्या संघटना नक्षलवादी विचारांच्या आहेत. हिंदु धर्माच्या विरोधात प्रचार प्रसार करण्यासाठी परदेशातून त्यांना निधी पुरवला जातो, असा आरोप हे कार्यकर्ते करीत होते.
दाभोलकर, कलबुर्गी खून तपासात समन्वय हवा
By admin | Published: February 13, 2016 2:24 AM