मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे हत्येप्रकरणी शुक्रवारी सीबीआय व सीआयडीने उच्च न्यायालयात तपास अहवाल सादर केले. या तपास अहवालावरून सीबीआयला अनेक बाबींसाठी परवानगी घ्यावी लागणार असल्याचे म्हणत, उच्च न्यायालयाने या सर्व बाबी कधीपर्यंत स्पष्ट करण्यात येतील? अशी विचारणा सीबीआयकडे केली. सीबीआय सीआयडीला मदत करेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे, असे न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. साधना जाधव यांनी अहवाल वाचल्यानंतर म्हटले. दाभोलकर व पानसरे यांच्या हत्येप्रकरणाचा तपास उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चालावा, यासाठी सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर व दाभोलकर, पानसरेंच्या कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शुक्रवारच्या सुनावणीत आरोपींच्या वकिलांनी कोल्हापूरमध्ये सुरू असलेल्या खटल्यासाठी विशेष सरकारी वकील म्हणून अॅड. शिवाजी राणे यांच्या नियुक्तीस विरोध केला आहे. आरोपींच्या म्हणण्यानुसार, राणे यांना राज्य सरकारने ‘विशेष सरकारी वकील’ म्हणून नियुक्त केले नाही. त्यांना कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षकांनी नियुक्त केले आहे. अधीक्षकांना विशेष सरकारी अधिकारी नियुक्त करण्याचा अधिकार नाही. त्याशिवाय राणे विशेष सरकारी वकिलांच्या पॅनेलवरही नाहीत, त्यामुळे त्यांना हा खटला चालवायला देऊ नये. या किरकोळ कारणावरून खटल्यास विलंब होऊ देऊ नका. राज्य सरकारने याचा निर्णय घ्यावा, अन्यथा आम्ही निर्णय घेऊ, असे स्पष्ट करत खंडपीठाने या याचिकांवरील पुढील सुनावणी २२ जून रोजी ठेवली आहे. (प्रतिनिधी)
दाभोलकर, पानसरे हत्या; तपास अहवाल सादर
By admin | Published: April 22, 2017 1:37 AM