पुणे : महात्मा गांधींच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली, तेवढयावरच आपण समाधान मानले, मात्र त्यांना मारणाऱ्या संस्थेकडे दुर्लक्ष केले. डॉ. नरेंद्र दाभोलकरांना मारणाऱ्यांचीच राजकीय शाखा आज सत्तेवर आहे, अशी जोरदार टिका महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी सोमवारी केली.अंनिसच्यावतीने डॉ. दाभोलकरांच्या खूनाला ५ वर्षे पूर्ण झाली तरी अद्याप त्यांच्या सुत्रधारांपर्यंत पोहचण्यात शासनाला अपयश आल्याच्या निषेधार्थ महर्षी विठठ्ल रामजी शिंदे पुलापासून ते साने गुरूजी स्मारकापर्यंत सकाळी मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर झालेल्या ‘व्यर्थ न हो बलिदान’ या परिसंवादात गांधी बोलत होते. डॉ. दाभोलकरांच्या कन्या मुक्ता दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या सून मेघा पानसरे, माजी पोलिस अधिकारी अशोक धिवरे यांनी यामध्ये सहभाग घेतला.तुषार गांधी म्हणाले, दाभोलकर यांच्या खून्यांना ५ वर्षांनी पकडल्याची बातमी आली आहे. मात्र ५ वर्षे त्यांना का पकडले गेले नाही. या काळात मारेकऱ्यांचा ज्या संस्थांशी संबंध होता, त्याबाबतचे पुरावे नष्ट करण्याचे काम केले गेले. त्यानंतर त्यांना पकडण्याचे नाटक करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे महात्मा गांधी यांच्या विचारांची दररोज हत्या केली जात आहे.लोकांच्या मनात प्रचंड विष पेरले गेले आहे. या विषारी आणि विखारी विचारधारेपासून तरुणांना लांब नेले पाहिजे, त्यासाठी बुद्धिप्रामाण्यवादी विचार रुजवला पाहिजे. या विचारधारेच्या विरोधात कुणी बोलू शकत नाही कारण देशात भय निर्माण केले आहे. याच लोकांनी देशाची फाळणी केली असून त्यांना आणखी फाळणी करायच्या आहेत. समाजसुधारकांनी दिलेल्या या बलिदानाची दर वर्षी आठवण करून देण्याची गरज भासता कामा नये असे गांधी यांनी सांगितले.
महात्मा गांधी, शहीद भगतसिंग यांचे विचार, उदद्ेश यांशी पुढच्या पिढयांनी गददरी केली, त्यामुळे त्यांचे बलिदान व्यर्थच गेले. आमच्या उदासिनतेने मोठयाप्रमाणात नुकसान झाले अशा भावना महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी व्यक्त केल्या.