कोल्हापूर : मौजे सांगाव (ता. कागल) येथे सोमवारी २२ कोटी ६० लाखांच्या विकासकामांचे लोकार्पण, मल्लिकार्जुन सेवा संस्थेचा अमृतमहोत्सव सोहळा व शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाळ्यात राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि पालकमंत्री आणि हसन मुश्रीफ यांना भाषण करताना अश्रू अनावर झाले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट सत्तेत सहभागी होण्यापूर्वी हसन मुश्रीफ यांना मधल्या काळात अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. अजित पवार यांनी दिलेल्या संधीमुळे आपण पालकमंत्री झालो. तसेच मतदारांनी आपल्यावर विश्वास दाखविला, नागरिकांनी सातत्याने पाठिंबा दिला, त्यामुळे आपण संकटातून सुखरूप बाहेर पडलो, अशा भावना व्यक्त करत असताना मुश्रीफ यांना अश्रू अनावर झाले.
याचबरोबर, "दादा आप आए बहार आयी है" असं म्हणत प्रोत्साहन पर अनुदानामध्ये तांत्रिक अडचणी आल्या आहेत, ज्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले आहेत. या योजनेबाबत एक बैठक घेण्याची गरज आहे, असे आवाहन हसन मुश्रीफ यांनी केले. तसेच, अजित पवार यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे. अचानक एक राजकीय भूकंप ऑगस्ट महिन्यात झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार वाढवण्यासाठी ही भूमिका घ्यावी लागली. ही भूमिका घेतल्यानंतर मतदारसंघातील जनतेने मला समजून घेतले, असे हसन मुश्रीफ म्हणाले.
अजितदादांनी आजपर्यंत अनेकवेळा मंत्रिमंडळात संधी दिली. पण कोल्हापूरचा पालकमंत्री होता आलं नव्हतं. तीसुद्धा संधी दादांनी दिली. मला आजपर्यंत जी खाती मिळाली त्यात ऐतिहासिक काम करण्याचे भाग्य मला मिळाले. मी शब्द देतो… महायुतीमधील एकाही पक्षाची तक्रार येणार नाही आणि विकासाच्या बाबतीत सुद्धा कोल्हापूरला मागे ठेवणार नाही, असेही हसन मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.
आम्ही सत्तेसाठी हपापलेलो नाही - अजित पवारकोल्हापूर हे राष्ट्रवादी पक्षाचेवैचारिक केंद्र म्हणून ओळखले जाते. आम्ही सत्तेसाठी हपापलेलो नाही. सत्ता येते आणि जाते. कोणीही कायम सत्तेत राहण्याचा ताम्रपट घेऊन जन्माला आलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मोठे व्हिजन असणारे नेते आहेत. तशा योजना चांदा ते बांधापर्यंत हव्यात. सर्वसामान्यांची कामे झाली पाहिजेत. यासाठी भाजप-शिवसेना सरकारमध्ये आम्ही सामील झालो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
याचबरोबर, विरोधी पक्षात असताना सरकारवर विकास कामांबाबत वजन पडत नाही, कामे होत नाहीत. जे कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेला नको आहेत ते प्रकल्प होणार नाहीत. वचनपूर्तीचे राजकारण करणारे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत. मुश्रीफ यांनी आता जास्त वेळ कागलमध्ये न थांबता, त्यांनी व आपल्या पक्षाच्या सर्वच आमदार, खासदार व प्रमुख नेत्यांनी महाराष्ट्रात फिरावे, असे अजित पवार म्हणाले.