विधान परिषदेला विजय मिळाला तरी देखील मंगळवारची पहाट महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप घेऊन आली आहे. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याआधी अजित पवारांनी पहाटेच भाजपासोबत जात शपथविधी पार पाडला होता. आता शिंदे यांनी रात्रीच्या वेळी थेट सुरत गाठत मविआ सरकार हादरवून सोडले आहे.
उद्धव ठाकरेंच्या स्वपक्षातील पाच मंत्रीच नॉट रिचेबल झाल्याची चर्चा होती. एकनाथ शिंदेंसह शंभूराज देसाई, संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार हे नॉट रिचेबल होते. आता शिवसेनेचे आणखी एक मंत्री दादा भुसेदेखील नॉटरिचेबल झाल्याचे दिसत होते. भुसे यांचा फोन लागत नव्हता, तसेच ते त्यांच्या निवासस्थानी देखील नव्हते. यामुळे उद्धव ठाकरेंविरोधातील या बंडाची व्याप्ती आता वाढू लागल्याचे दिसत होते.
सुमारे तासाभरानंतर दादा भुसे यांच्याशी संपर्क झाला. त्यांनी मी मुंबईतच असल्याचे सांगितले. तसेच निवासस्थानी नसून एका हॉटेलमध्ये थांबलो आहे. दुपारी १२ वाजता वर्षावर दिसेन, असे ते म्हणाले.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत मध्यरात्री पोहोचलेल्या आमदारांमध्ये रमेश बोरणारे, अब्दुल सत्तार, संजय शिरसाट, उदयसिंग राजपूत, संदीपान भुमरे, प्रदीप जैस्वाल हे आहेत. या आमदारांना शिंदे यांनी मोठया प्रमाणात विकासनिधी दिला आहे. दुसरीकडे राजन विचारे, रविंद्र फाटक हे ठाण्यातच आहेत. प्रताप सरनाईक यांचा फोन मात्र नॉट रिचेबल येत आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे हे आज दुपारी सूरतमध्येच पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे वृत्त आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या नाराजीमुळे राज्यातील राजकारणात भूकंप झाला असून, त्यांची नाराजी दूर करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यातच एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार वास्तव्य करून असलेल्या हॉटेलबाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.