मुंबई : मुख्यमंत्रिपदाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा निर्णय भाजपप्रमाणे आम्हालाही मान्य असेल, असे विधान काळजीवाहू मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्यानंतर आता मुख्यमंत्रिपद भाजपला मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे चित्र आहे. अशा परिस्थित आता शिंदेसेनेकडून उपमुख्यमंत्रिपदासाठी दावेदारी पुढे येण्याची शक्यता आहे. यासाठी एकनाथ शिंदे यांचे निकटचे स्नेही व विश्वासू शिलेदार दादा भुसे यांचे नाव अग्रभागी असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीने अनपेक्षित असे निर्भेळ यश मिळविले. त्यात भाजप हा सर्वांत मोठा पक्ष ठरला, तर त्याखालोखाल शिंदेसेना व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार विजयी झाले आहेत. निवडणुकीचा निकाल लागून चार दिवस उलटले तरी स्पष्ट बहुमत असूनही सत्तास्थापनेचा दावा अद्याप महायुतीकडून करण्यात आलेला नाही. मुख्यमंत्रिपद नेमके कुणाकडे, याचा फैसला अद्याप गुलदस्त्यात असल्यामुळे राजकारणात रोज घडणाऱ्या नाट्यमय घडामोडींकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. त्यातच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होण्याची शक्यता धुसर होत असताना शिंदेसेना व राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे उपमुख्यमंत्रिपद येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
एकनाथ शिंदे हे स्वतः साठी उपमुख्यमंत्री व अन्य मंत्रिपद घेण्यास उत्सुक नसल्याची चर्चा असताना शिंदेसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी कोण, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. त्यात एकनाथ शिंदे यांचे निकटचे स्नेही व विश्वासू सहकारी दादा भुसे यांचे नाव उपमुख्यमंत्रिपदासाठी अग्रभागी आहे. शिंदेसेनेच्या निवडून आलेल्या आमदारांमध्ये दादा भुसे यांनी सलग पाचव्यांदा विधानसभा गाठली आहे. मालेगाव बाह्य मतदारसंघातून ते २००४ पासून सातत्याने नेतृत्व करत आले आहेत. याशिवाय त्यांनी देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात मंत्रिपदे भूषविली आहेत.
नाशिकसह धुळे, पालघरचे पालकमंत्रिपदही त्यांनी सांभाळले आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले. त्यावेळी त्यांनी आपल्याकडील सार्वजनिक बांधकाम खाते हे दादा भुसे यांच्याकडे सोपवले होते. याशिवाय, दादा भुसे यांचा धर्मवीर आनंद दिघे यांच्याशीही स्नेह होता. बंडात भुसे यांनी शिंदे यांची साथ करत वेळोवेळी पक्षाची भूमिकाही समर्थपणे निभावली आहे. त्यामुळे दादा भुसे यांच्यासारख्या अनुभवी नेत्याकडे उपमुख्यमंत्रिपद येण्याची जास्त शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.अशातच आज दिल्लीत महत्त्वाची बैठक होणार आहे. याच बैठकीत महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण आणि उपमुख्यमंत्री कोण? यावर शिक्कामोर्तब होणार आहे.