- दीप्ती देशमुख, मुंबईदिवंगत मराठी अभिनेते व निर्माते दादा कोंडके यांच्या मृत्यूनंतर १८ वर्षांनंतरही त्यांच्या संपत्तीचा वाद मिटलेला नाही. दादा कोंडके यांची मुलगी असल्याचा दावा करणाऱ्या तेजस्विनी विजय शिवा यांना पुणे दिवाणी न्यायालयाने दिलेल्या वारसापत्राच्या निर्णयाविरुद्ध ‘शाहीर दादा कोंडके प्रतिष्ठान’ने उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे.दादा कोंडके यांनी २ जानेवारी १९९८ रोजी इच्छापत्र तयार केले. इच्छापत्राचे कार्यवाह म्हणून ‘शाहीर दादा कोंडके प्रतिष्ठान’ची स्थापनाही त्यांनी केली. मात्र दादा कोंडके यांची संपत्ती मिळावी यासाठी तेजस्विनी विजय शिवा यांनी वारसपत्र मिळवण्यासाठी पुणे दिवाणी न्यायालयात अर्ज केला. पुणे दिवाणी न्यायालयाने त्यांना वारसपत्र दिले. त्यास ‘प्रतिष्ठान’चे विश्वस्त व ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण, अफ्रिन चौगुले, हृदयनाथ दत्तात्रय कडू-देशमुख, ललिता वाकणकर, सायली वराडकर, संग्राम शिर्के व रोहित कडू-देशमुख यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. अपीलानुसार, तेजस्विनी यांना वारसपत्र देताना दिवाणी न्यायालयाने प्रतिष्ठानची बाजू ऐकलीच नाही. वारस जाहीर करण्यापूर्वी न्यायालयाने नोटीस बजावून मृत व्यक्तीचे अन्य कोणी वारसदार आहे की नाही, याची खातरजमा करून घेणे आवश्यक होते. मात्र न्यायालयाने ही कायदेशीर प्रक्रिया डावलली. संपत्तीच्या व्यवस्थापनाच्या मुद्द्यावरून तेजस्विनी यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. याच अर्जावरील सुनावणीत उच्च न्यायालयाने ५ जून २००८ रोजी दादा कोंडके आणि तेजस्विनी यांच्या नात्यावरूनच वाद असल्याने संपत्तीचे व्यवस्थापन करण्याच्या अर्जावर सुनावणी घेताना तेजस्विनी यांच्या दाव्यात किती तथ्य आहे, हे तपासून घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र तेजस्विनी यांना वारसपत्र देताना दिवाणी न्यायालयाने याकडेही दुर्लक्ष केले, असेही संस्थेने दाव्यात नमूद केले आहे. (प्रतिनिधी)
दादा कोंडके यांच्या संपत्तीचा वाद हायकोर्टात
By admin | Published: April 10, 2016 3:12 AM