ऑनलाइन टीम
मुंबई, दि. ७- चित्रपट किंवा मालिकांच्या चित्रीकरणा दरम्यान पोलिस, महापालिका किंवा कोणत्याही कामगार संघटनेची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. शूटिंगसाठी परवानगी घेतलेल्या निर्मार्त्यांच्या शूटिंग दरम्यान जबरदस्तीने पैसे उकळणा-यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश मुंबई पोलिस आयुक्तांनी दिले आहेत. तसेच शूटिंगसाठी झटपट परवानगी मिळावी यासाठी मारियांनी एक खिडकी केंद्रही सुरु करण्याचे आश्वासन सिनेनिर्मात्यांच्या शिष्टमंडळाला दिले आहे.
चित्रपट आणि मालिका क्षेत्रातील निर्मात्यांच्या शिष्टमंडळाने नुकतीच पोलिस आयुक्त राकेश मारियांची भेट घेतली. या शिष्टमंडळात विकास मोहन, अशोक पंडित. रमेश तौरानी आदी मंडळींचा समावेश होता. या बैठकीत मारियांनी निर्मातांच्या समस्या जाणून घेतल्या. या भेटीनंतर पोलिस आयुक्तांनी स्थानिक पोलिस ठाण्यांनीच शूटिंगसाठी परवानगी द्यावी असे स्पष्ट आदेश दिले. तसेच पोलिसांच्या परवानगीनुसार शुटिंग होत असेल तर कोणताही अन्य व्यक्ती तिथे येऊन दादागिरीने किंवा धमकावून पैसे घेऊ शकत नाही. या प्रकारांवर लगाम लावण्याची जबाबदारीही स्थानिक पोलिसांचीच असेल असे आदेशात म्हटले आहे.