मुंबई : रेल्वे अर्थसंकल्पात कोकणवासीयांना वाटाण्याच्या अक्षता दाखवल्या जात असतानाच प्रत्यक्षात कोकणच्या सेवेत असणा:या गाडय़ाही आता वेळेवर धावत नसल्यामुळे त्यांची वाताहतच होत असल्याचे आता समोर येत आहे. दादर-रत्नागिरी या पॅसेंजर ट्रेनला सातत्याने लेटमार्क मिळत असून मे महिन्यात तब्बल 29 वेळा ही ट्रेन उशिराने धावल्याचे रेल्वेतील सूत्रंकडून सांगण्यात आले आहे. या लेटमार्कमुळे या पॅसेंजर ट्रेनला दिवा स्थानकातूनच सोडले जात आहे. त्याचाच मोठा फटका प्रवाशांना बसत आहे.
दादर-रत्नागिरी-दादर पॅसेंजर ट्रेन ही आठवडाभर धावते. दादर स्थानकातून ही ट्रेन दुपारी 1.35 वाजता सुटते आणि रत्नागिरीत त्याच दिवशी रात्री 12.50 वाजता पोहोचते. तर ही ट्रेन रत्नागिरीतून पहाटे साडेपाच वाजता सुटते आणि त्याचदिवशी दुपारी दीड र्पयत दादरला येते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या ट्रेनला बराच लेटमार्क मिळत असून त्यामुळे दादर स्थानकाऐवजी दिवा स्थानकातूनच ट्रेन सोडली जात आहे. दादर स्थानकात ट्रेनची वाट पाहात उभे असलेल्या प्रवाशांना याची माहिती एक ते दीड तास अगोदर दिली जात असल्यामुळे त्यांची तारांबळ उडते आणि आपल्याजवळील सामान घेऊन दिवा स्थानक गाठावे लागते. याबाबत रेल्वेतील सूत्रंकडून सांगण्यात आले की, मे महिन्यात तर या ट्रेनला तब्बल 29 दिवस लेटमार्क लागले आहे. यातील तीन दिवस कोकण रेल्वेकडून तर 26 दिवस मध्य रेल्वेकडूनच लेटमार्क लागला आहे. तर फक्त दोन वेळा पॅसेंजर ट्रेन मध्य रेल्वेकडून वेळेवर धावली आहे. हे पाहता मध्य रेल्वेकडूनच ट्रेन उशिराने सोडण्यात येत असल्याचे आणि तिला लेटमार्क मिळाल्याचे स्पष्ट होत आहे. मध्य रेल्वेकडून 26 दिवस ही ट्रेन दीड ते साडेतीन तास उशिराने धावत राहिली असल्याचे सांगण्यात आले. मध्य रेल्वेकडून उपनगरीय लोकल गाडय़ांनाच प्राधान्य दिले जाते. या गाडीची वेळ पाहता ती मुंबईत आल्यावर लोकल गाडय़ांना लेटमार्क मिळू शकतो, या भीतीने पॅसेंजर ट्रेनला दिवा स्थानकात शेवट करून त्याच स्थानकातून पुन्हा रत्नागिरीसाठी सोडले जात असल्याचे सांगण्यात आले.
काही तांत्रिक समस्यांमुळे कोकण रेल्वेकडून अवघे तीन दिवस ही ट्रेन उशिराने धावली. त्यामध्ये एक ते दोन तास ट्रेन उशिराने धावल्याचे सूत्रंकडून सांगण्यात आले. मध्य रेल्वेकडून मोठय़ा प्रमाणात लेटमार्क लागत असूनही त्यावर तोडगा न काढता कोकणवासीयांची हेळसांड करण्याचे काम केले जात आहे. याबाबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांना विचारले असता, ही ट्रेन कोकणकडूनच उशिराने येत असल्याने तिचा दिवा स्थानकात शेवट करीत असल्याचे सांगितले. मात्र पॅसेंजर ट्रेन उशिराने धावत असल्याने त्याची सविस्तर माहिती मागितली असता ते देऊ शकले नाहीत.
तारांबळ उडते
दादर स्थानकाऐवजी दिवा स्थानकातून ट्रेन सोडली जात आहे. दादर स्थानकात ट्रेनची वाट पाहात उभे असलेल्या प्रवाशांना याची माहिती एक ते दीड तास अगोदर दिली जात असल्यामुळे त्यांची तारांबळ उडते आणि आपल्याजवळील सामान घेऊन दिवा स्थानक गाठावे लागते.