ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 30 - आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टाळीसाठी पुढे केलेला हात उद्धव ठाकरे यांनी झिडकारला आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर युतीचा प्रस्ताव घेऊन रविवारी मातोश्रीवर गेले होते. त्यांनी शिवसेना नेत्यांशी चर्चाही केली.
पण आपल्यापर्यंत युतीचा प्रस्ताव आलेलाच नाही, आपण कोणाशीही युती करणार नाही असे उद्धव यांनी सांगितले. आपण पूर्ण सामर्थ्याने मैदानात उतरलो असून मुंबई महापालिकेवर भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही असे उद्धव यांनी सांगितले.
महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपा युती तुटल्यानंतर मनसेने शिवसेनेला युतीचा प्रस्ताव दिला होता. मनसेने यासाठी कुठलीही अटही ठेवली नव्हती अशी माहिती आहे. ही युती झाली तर, मराठी मतांचे विभाजन टळेल त्यामुळे ही युती व्हावी अशी शिवसेना नेते मनोहर जोशींसह मराठीजनांची इच्छा होती पण उद्धव यांनी युती न करण्याची भूमिका घेतली आहे.