सोलापूर : पासपोर्ट सेवा अधिक सुलभ करण्यावर सरकारचा भर आहे. त्या अंतर्गत देशभरातील ८६ टपाल कार्यालयांत पासपोर्ट लघुसेवा केंद्र उभारण्याचे सरकारचे नियोजन आहे. त्यातील १९ केंद्रे महाराष्टÑात उघडली जातील, अशी माहिती परराष्टÑ व्यवहार राज्यमंत्री जनरल डॉ. व्ही.के. सिंग यांनी शनिवारी दिली.सोलापुरातील पासपोर्ट लघुसेवा केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग सेवेद्वारे त्यांनी संवाद साधला. सरकारने पासपोर्ट सेवा सुलभ करण्याचे ठरवले आहे. त्या अंतर्गत अनेक अटी शिथिल केल्या असून कामातही सुसूत्रता आणि पारदर्शकता आणली आहे. त्यामुळे क्लिष्टता कमी झाली असून अगदी विनाप्रयास पासपोर्ट मिळविणे आता सर्वसामान्य जनतेला सोपे होणार आहे. या सेवेशी अधिकाधिक नागरिक जोडले जावेत, यासाठी देशभरात पासपोर्ट सेवा केंद्र वाढविण्याचे नियोजन आहे. पासपोर्ट काढण्यासाठी ५० किलोमीटरपेक्षा अधिक अंतर नागरिकांना यापुढे जावे लागू नये, अशी सरकारची भूमिका आहे, असेही सिंग यांनी स्पष्ट केले. भविष्यात देशभरात २३६ शहरांमध्ये पासपोर्ट सेवा केंद्रे उभारली जाणार असल्याची माहितीही त्यानी दिली.सोलापुरातील केंद्रावरून दररोज १०० पासपोर्ट देण्याची सुविधा राहील. भविष्यात ही संख्या गरजेनुसार वाढविली जाईल. या कार्यालयाचा मराठवाडा आणि सोलापूरला अधिक लाभ होईल. देशात एकूण पाच पासपोर्ट लघुसेवा केंद्रे सुरू होत आहेत. सोलापुरात सुरू झालेले हे राज्यातील पहिले आणि देशातील चौथे पासपोर्ट लघुसेवा केंद्र आहे.
‘देशातील ८६ टपाल कार्यालयांत पासपोर्ट लघुसेवा केंद्र उभारणार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 12:20 AM