मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणेच दहीहंडी साजरी व्हावी यासाठी पोलिसांनी मोर्चेबांधणी केलेली असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मात्र पारंपरिक पद्धतीनेच दहीहंडी साजरी करण्याची भूमिका घेतली आहे. राज्य सरकारच्या पळपुट्या धोरणामुळेच दहीहंडी सणाचा विचका झाला आहे. कारवाई केल्यास हे प्रकरण भडकेल, असा इशाराच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे. जागतिक विक्रम रचणाऱ्या मुंबईच्या ‘जय जवान गोविंदा पथका’ने दहिहंडीबाबत सर्वोच्च न्यायालयात पुर्नविचार याचिका दाखल केली होती. बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने जय जवानची याचिका फेटाळली. कृष्णकुंज या आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना राज यांनी न्यायालयाच्या हेतुवरच प्रश्न उपस्थित केले. दहीहंडीसंदर्भात निर्णय देताना न्यायालयाने दुसरी बाजू समजूनच घेतली नाही. सरकारच्या पळपुट्या धोरणामुळे दहीहंडीचा विचका झाल्याचा आरोप राज यांनी केला. २०१३ सालच्या टोलविषयक याचिकेवर अजूनही तारीख पडत नाही. मात्र दहीहंडीसारख्या हिंदुंच्या सणांवर मात्र पटकन निर्णय होतात. हे हिंदुंचे सण बंद करण्याचे षडयंत्र आहे का, असा सवालही राज यांनी केला. दहीहंडीत नियमभंग झाल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. याबाबत विचारले असता राज म्हणाले की, ‘या लोकांनी इसिसच्या दहशतवाद्यांवर लक्ष केंद्रीत करा. न्यायालयाबद्दल आदर आहेच, मात्र एकच बाजू ऐकून निर्णय घेणार असाल तर त्याला विरोध होणारच.’ >दहीहंडीवर लक्ष केंद्रीत करण्याऐवजी या लोकांनी इसिसच्या दहशतवाद्यांकडे लक्ष द्यावे. न्यायालयाविषयी आदर आहे, पण एकच बाजू समजून घेऊन निर्णय घेण्यात येणार असेल, तर विरोध करणारच.- राज ठाकरे, अध्यक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
‘सरकारच्या पळपुट्या धोरणामुळे दहीहंडीचा विचका’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2016 5:02 AM