मुंबई : दहीकाल्याच्या उत्सवादिवशी मुंबई व ठाणे शहरात लागणाऱ्या दहीहंड्या व त्यामध्ये गोविंदा पथकांतील मुले पडून होणारे अपघात, दहीहंडीच्या उंचीबाबतचे वाद यामधून सरकारची सुटका करवून घेण्याकरिता दहीहंडीला साहसी क्रीडा प्रकाराचा दर्जा देण्यात आल्याची घोषणा क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी केली. यामुळे आता गोविंदांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची जबाबदारी गोविंदा पथकांवर राहील. १२ वर्षांवरील मुले या क्रीडा प्रकारात भाग घेऊ शकतील, तसेच थरांच्या उंचीच्या वादात सरकार पडणार नाही, असे तावडे यांनी स्पष्ट केले.तावडे म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने २०१२मध्ये जाहीर केलेल्या क्रीडा धोरणात गोविंदाचा साहसी क्रीडा प्रकारात समावेश करण्याबाबतची तरतूद केलेली होती. त्या अनुषंगाने विधिमंडळाच्या अधिवेशनात सर्वपक्षीय आमदारांनी मागणी केल्यामुळे आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त केली होती. त्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार गोविंदा साहसी क्रीडा प्रकार घोषित करण्यात आला आहे. गोविंदाला प्रोत्साहन देण्याकरिता वर्षभरात केव्हाही त्याचे आयोजन केले जाईल, उत्तम कामगिरी करणाऱ्यांना साहसी क्रीडा प्रकाराचे पुरस्कार दिले जातील, साहसी क्रीडा प्रकार अकादमी स्थापन केली जाईल.गोविंदा या साहसी क्रीडा प्रकाराचे आयोजन करताना खेळात सहभागी गोविंदांच्या सुरक्षेकरिता हेल्मेट, सेफ्टीनेट, मॅट, रुग्णवाहिका, डॉक्टर यांची व्यवस्था गोविंदा पथकाला करावी लागेल. लहान मुले घरी न सांगता गोविंदा पथकात सामील होतात. त्यावर बंधन घालण्याकरिता १२ ते १५ वयोगटातील गोविंदांना चवथ्या थराच्या वर चढवायचे असेल तर पालकांच्या मान्यतेचे पत्र गोविंदा पथकांकडे जमा करावे लागेल.
दहीहंडी आता साहसी खेळ!
By admin | Published: August 13, 2015 4:22 AM