मुंबई : जगभरात वाढत असलेला क्षयरोग देशातही वाढत आहे. देशाच्या तुलनेत राज्यासह मुंबईत क्षयरोगाचे प्रमाण जास्त आहे. मुंबईसारख्या शहरात क्षयरोगाचा वाढता प्रसार आणि रुग्णांमध्ये क्षयरोग बळावण्याचे प्रमाण यावर उपाय म्हणून सप्टेंबर महिन्यापासून क्षयरोग रुग्णांना दररोज गोळ््या देण्यात येणार असल्याचे इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चच्या महासंचालक आणि केंद्रीय आरोग्य संशोधन विभागाच्या सचिव डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी शुक्रवारी मुंबईत सांगितले. क्षयरोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेता मुंबईत विशेष कार्यक्रम आखण्याची आवश्यकता आहे. त्याचबरोबर संशोधन झाले पाहिजे. यासाठी सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत ‘महाराष्ट्रातील क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम’ या विषयावर आरोग्य खात्यातर्फे एक दिवसीय परिसंवाद आयोजन केले होते. या परिसंवादाला केंद्रीय क्षयरोग नियंत्रण विभागाचे उपमहासंचालक डॉ. सुनील खापर्डे, आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक, नॅशनल हेल्थ मिशनचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रदीप व्यास, अतिरिक्त पालिका आयुक्त आय. एस. कुंदन, राज्याचे क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ. संजीव कांबळे, पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर आदि मान्यवर उपस्थित होते. क्षयरोग रुग्णांना सध्या एक दिवसाआड औषध दिले जाते. पण, सप्टेंबर महिन्यापासून रोजच्या रोज औषध देण्यात येणारआहे. मुंबईत जास्त लोकसंख्या, गर्दी असल्यामुळे क्षयरोगाची लागण होण्याचा धोका अधिक आहे. त्यात लहान मुलांना संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. त्यासाठी विशेष शोध मोहीम हाती घेतली जाणार आहे. (प्रतिनिधी)
सप्टेंबरपासून क्षयरोग रुग्णांना मिळणार रोज औषध
By admin | Published: June 25, 2016 3:57 AM