जालना : अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा येथील एका दलित युवकाच्या हत्येची धग कायम असतानाच बदनापूर तालुक्यातील नानेगाव येथील दलित सरपंच मनोज कसाब यांच्या हत्येचे प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी पोलीसांनी माजी उपसरपंच गणेश चव्हाणसह आठ आरोपींनी अटक केली असून, अजून तिघांचा शोध सुरू आहे. या घटनेने मराठवाड्यासह राज्यभर संताप व्यक्त होत आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती, अशी नानेगावातील ग्रामपंचायत व अंगणवाडीच्या बांधकामावरून सरपंच मनोज कसाब व माजी उपसरपंच गणेश चव्हाण यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. या वादातूनच ३ एप्रिल रोजी सरपंच कसाब यांना मारहाण करण्.यात आली होती. त्यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर जालना येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान सोमवारी त्यांचे निधन झाले. या घटनेने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी त्यांचा मृतदेह जिल्हाधिकारी कार्यालयात आणून ठेवला. या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक केल्याचे खुद्द जिल्हा पोलिस अधीक्षकांनी तेथे येऊन सांगितल्यानंतर हा मृतदेह अंत्यविधीसाठी नानेगाव येथे नेण्यात आला. लात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रकरणी, गणेश धोंडिबा चव्हाण, बाबूराव धोंडिबा चव्हाण, उमेश गणेश चव्हाण, किशोर गणेश चव्हाण, संतोष महादू शिंदे, पमू डिगांबर चव्हाण, तुकाराम डिगांबर चव्हाण, डिगांबर रामचंद्र चव्हाण, बद्री कृृष्णा चव्हाण, कृष्णा रघुनाथ चव्हाण, बळीराम कृष्णा चव्हाण यांच्याविरुद्ध ३०२ व अॅट्रा्रसिटीचा गुन्हा दाखल केला. रुग्णवाहिका पाहून खळबळ मुख्य प्रवेशद्वारासमोर उभ्या असलेल्या या रुग्णवाहिकेमुळे परिसरात खळबळ उडाली. मृतदेह घेऊन आलेल्या सुमारे दीडशे जणांनी जिल्हा कचेरीसमोरच रस्त्यावर निदर्शने केली. मंगळवारी राजाबाग दर्गा उरूसमुळे जिल्'ात सरकारी सुटी असल्याने कार्यालयात कुणीही हजर नव्हते. मात्र या प्रकाराची माहिती कळताच जिल्हा पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह या तातडीने ताफ्यासह तेथे पोहोचल्या. पोलीसांनी सांगितले, की कसाब व माजी उपसरपंच गणेश चव्हाण यांच्यासह समर्थकांत गेल्या काही महिन्यांपासून वाद-विवाद सुरू होता. विशेषत: गावअंतर्गत राजकारणच त्यास कारणीभूत आहे. नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीत बांधकाम का केले म्हणून मारहाण झाल्याचे नमूद करीत संबंधितांनी आरोपींनी जातीवाचक शिवीगाळ केली असल्याचे म्हटले आहे. २०१० मध्ये मनोज कसाब हे सरपंच झाले होते.
दलित सरपंचाचा खून
By admin | Published: May 07, 2014 5:42 AM