बांदा : सावंतवाडी तालुक्यातील पाडलोस गावच्या पाणलोट संदर्भात सुरू असलेल्या विशेष ग्रामसभेत महिला सरपंच अमिषा पटेकर (३५, रा. पाडलोस केणीवाडा) यांना शिवसेना शाखाप्रमुख तथा तंटामुक्ती अध्यक्ष महेश वासुदेव कुबल (४५, रा. पाडलोस केणीवाडा) याने मारहाण केल्याची घटना सोमवारी घडली.या मारहाणीत सरपंच पटेकर यांच्या हाताला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथेच त्यांची उशिरा तक्रार घेण्यात आली. तर महेश कुबल यानेही सरपंच अमिषा पटेकर यांच्याविरोधात तक्रार दाखल दिली आहे. बांदा पोलिसांनी महेश कुबल याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी दिली.पाडलोस येथील ग्रामपंचायत सभागृहात पाणलोट संदर्भात सोमवारी विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. विश्वनाथ नाईक यांच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या या बैठकीत सुरुवातीपासूनच गरम वातावरण होते. यावेळी शिवसेना शाखाप्रमुख तथा तंटामुक्त अध्यक्ष महेश कुबल याने प्रश्न विचारण्यासाठी पुढे जाण्याचा प्रयत्न केला असता त्याच्यात व सरपंच अमिषा पटेकर यांच्यात शाब्दिक वाद होत हमरीतुमरी झाली.यावेळी महेश कुबल याने पटेकर यांच्यावर हात उचलत त्यांना ढकलून दिल्याने त्या खाली पडल्या. त्यामुळे त्यांच्या हातातील बांगड्या फुटून त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. तसेच कुबल याने पटेकर यांच्या श्रीमुखात भडकाविली. यावेळी हातातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागल्याने त्यांना ग्रामस्थांनी खुर्चीवर बसविले. त्यामुळे खुर्चीही रक्ताने माखली. त्यातच त्यांना चक्कर आल्याने त्यांना बांदा आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.यावेळी ग्रामपंचायत सदस्य अक्रम खान, जावेद खतीब, रोणापाल सरपंच सुरेश गावडे, गुरुनाथ सावंत, ज्ञानेश्वर सावंत, अन्वर खान, संदीप बांदेकर, शिवसेना उपतालुकाप्रमुख राजू शेटकर आदी उपस्थित होते. भर ग्रामसभेत महिलेवर हात उचलणाºयावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी संजू परब यांनी पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांच्याकडे केली. यावेळी कळेकर यांनी सरपंच जी तक्रार देतील त्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले. तर महेश कुबल याने बांदा पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीत ग्रामसभेत आपण प्रोसेडिंगची मागणी करण्यासाठी अध्यक्षांच्या टेबलकडे गेलो असता गेली कित्येक वर्षे तू मला त्रास देत असल्याचे सांगत आपल्या श्रीमुखात मारली. परत दुसºयावेळी मारताना आपण हात आडवा आणल्याने त्या धक्क्याने खाली पडल्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे.सरपंच पटेकर यांचा जबाब उपनिरीक्षक शितल पाटील यांनी घेतला. यावेळी पटेकर यांनी महेश कुबल याने आपल्याला हाताने मारहाण करून मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याची तक्रार दिली आहे. त्यानुसार महेश कुबल याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे बांदा पोलिस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी सांगितले.शिवसेना-स्वाभिमानचे पदाधिकारी दाखलदरम्यान, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी बांदा पोलीस स्थानकात दाखल झाले होते. तर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे तालुकाध्यक्ष संजू परब हे आपल्या कार्यकर्त्यांसह पोलीस स्थानकात दाखल झाले. एखाद्या महिलेवर हात उगारणे योग्य नसल्याचे सांगत त्यांनी जोपर्यंत मारहाण करणा-याला अटक होत नाही तोपर्यंत जाणार नसल्याचा पवित्रा संजू परब आणि सहका-यांनी घेतला.
पाडलोसच्या महिला सरपंचांना मारहाण, शिवसेना शाखाप्रमुखाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2017 9:17 PM