मुंबई : मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रावर यंदा पावसाने कृपा केल्याने आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यातच राज्यातील धरणे भरू लागली आहेत. राज्यात ८ आॅगस्टपर्यंत १०१ मोठ्या प्रकल्पात सरासरी ६५ आणि २२८ मध्यम प्रकल्पात ५२ तर २२७० लहान प्रकल्पात ४७ टक्के पाणीसाठा झाला आहे. गेल्या वर्षी आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यात मोठ्या प्रकल्पांत केवळ ४५ टक्के पाणीसाठा झाला होता. जलसाठ्यात कोकणाची स्थिती चांगली असून तेथील १६२ प्रकल्पांत सरासरी ८८ टक्के साठा झाला आहे. नागपूर विभागातील ३६७ प्रकल्पांत ६२, अमरावतीच्या ४८० प्रकल्पांत ६७, नाशिकच्या ३५१ प्रकल्पांत ६१ तर पुणे विभागातील ४१० प्रकल्पांत सरासरी ७० टक्के पाणीसाठा झाला आहे. मराठवाड्यात स्थिती चिंताजनकच मराठवाड्यात मात्र स्थिती चिंताजनकच आहे. विभागातील ११ मोठ्या प्रकल्पांत २७ व ७५ मध्यम प्रकल्पांत १७ तर ७३२ लघु प्रकल्पांत केवळ सरासरी २४ टक्के जलसाठा झाला आहे. रविवारी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला़ कोकण, गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. पुढील २४ तासांत कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़ कोयना पाणलोट क्षेत्रात आठ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने रविवारी धरणातील सहा वक्री दरवाजांमधून १५,६०० असा सुमारे १७,७११ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. संगमनगर धक्का पूल पाण्यासाठी गेल्याने ३६ गावांचा संपर्क तुटला आहे.
धरणे अर्ध्यापेक्षा अधिक भरली!
By admin | Published: August 08, 2016 5:40 AM