ही पवार कुटुंबाचीच खेळी?; ईडी भेटीची भूमिका अन् अजितदादांचा राजीनामा 'डॅमेज कंट्रोल'साठी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 01:18 PM2019-09-28T13:18:54+5:302019-09-28T13:24:19+5:30

राष्ट्रवादी पक्षात अनेक गट कार्यरत आहे. या गटबाजीमुळे राष्ट्रवादीचे जे काही डॅमेज झाले आहे, हे डॅमेज करण्यासाठी पवार आणखी कोणती खेळी खेळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Is this for the 'Damage Control', by the Pawar family? | ही पवार कुटुंबाचीच खेळी?; ईडी भेटीची भूमिका अन् अजितदादांचा राजीनामा 'डॅमेज कंट्रोल'साठी

ही पवार कुटुंबाचीच खेळी?; ईडी भेटीची भूमिका अन् अजितदादांचा राजीनामा 'डॅमेज कंट्रोल'साठी

Next

- राजा माने
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर शिखर बँकेच्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून  दाखल कऱण्यात आलेल्या गुन्ह्यावर पवारांनी घेतलेला स्टँड आणि अजित पवार यांनी अचानक दिलेला राजीनामा यामुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. अजित पवार अल्पअवधीसाठी राजकीय संन्यास घेणार की, नवीन पक्ष स्थापन करणार की, भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चांना सध्या उधाण आले आहे. परंतु, निवडणुका काही दिवसांवर असताना अजित पवारांनी राजीनामा देणे ही घटना म्हणजे पवार कुटुंबीयांची खेळी असल्याचा तर्क काढला जात आहे.

गेल्या 15 वर्षांपासून तशी अजित पवार यांच्याकडेच राष्ट्रवादीची सूत्र होती. त्यामुळे सहाजिकच अजित पवार विरोधकांकडून टार्गेट होणार होते. या पार्श्वभूमीवर ईडीने अजित पवार यांच्यावर दाखल केलेले गुन्हे आणि त्यात शरद पवारांचेही नाव आल्याने अजित पवार यांना वैफल्य येणे स्वभाविक आहे. त्यामुळे राजकारणापासून काही काळ दूर राहावं असंही त्यांना वाटत असेल. मात्र स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याचा मानस अजित पवारांचा असू शकत नाही.कारण महाराष्ट्राच्या राजकारणात खुद्द पवार यांनी दोनवेळा पक्ष स्थापन केले. तरी देखील त्यांना 70-75 च्या वर जागा निवडून आणता आल्या नाही.त्यामुळे अजित पवार त्यासंदर्भातील त्यांच्या मर्यादा जाणून पक्ष स्थापन करतील याची सुताराम शक्यता दिसत नाही.

शरद पवार यांचे राजकारण कायमच तत्वनिष्ठ राहिले आहे. तरीही त्यांच्या कार्यकर्त्यांचे राजकारण शरद पवार या एका व्यक्तीच्या अवतीभवतीच फिरत होते. त्याच आधारावर सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी आजवर व्यक्तीनिष्ट राजकारण केले. याउलट रोहित पवार  आपल्या आजोबांची परंपरा अर्थात धर्मनिरपेक्षता आणि पुरोगामित्वाला प्राधान्य देऊन तत्वनिष्ठ राजकारण करण्याच्या मार्गाने पुढे चालण्यावर भर देत आहेत. तर पार्थ पवार असतील किंवा त्यांचे नातेवाईक हे प्रॅक्टीकल विचार करणारे आहेत.

अजित पवार यांनी कधीही तत्वनिष्ट राजकारण केले नाही. त्यामुळे ते स्वतंत्र पक्ष स्थापन करतील याची शक्यता नाही. किंबहुना आज शरद पवार त्यांची समजून काढून काही काळासाठी विश्रांती घेण्याचा सल्ला देऊ शकतात. त्याचवेळी राष्ट्रवादी पक्षात अनेक गट कार्यरत आहे. या गटबाजीमुळे राष्ट्रवादीचे जे काही डॅमेज झाले आहे, हे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी पवार आणखी कोणती खेळी खेळणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Web Title: Is this for the 'Damage Control', by the Pawar family?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.