पुणे : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे १३ जिल्ह्यातील तब्बल २ लाख १ हजार ४९६ हेक्टरवर क्षेत्रावरील पिके बाधित झाली असून, कोल्हापूर आणि सांगलीला सर्वाधिक फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या फळबागांचे नुकसान झाले असल्यास त्यांना पांडुरंग फुंडकर फळबाग योजनेअंतर्गत बागांची पुनर्उभारणी करण्यासाठी शंभरटक्के अनुदान दिले जाईल, अशी माहिती फलोत्पादन मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. फलोत्पादन मंत्री क्षीरसागर यांनी विभागातील कामाकाजाचा आढावा घेण्यासाठी कृषी आयुक्तालयात बैठक बोलावली होती. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी काय उपाययोजना करणार याची माहिती दिली. कृषी आयुक्त सुहास दिवसे यावेळी उपस्थित होते. क्षीरसागर म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रात ओला दुष्काळाला सामोरा जात आहे. तर, मराठवाड्यात अजूनही सहाशे टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. जायकवाडी धरणात ६५ टक्के पाणीसाठा झाला असला तरी, मांजरा आणि अन्य प्रकल्पात पाणी नाही. पश्चिम महाराष्ट्रात उपग्रहाद्वारे प्राप्त झालेल्या छायाचित्रा नुसार दोन लाखांहून अधिक शेती पाण्याखाली गेली आहे. फळबागांसह इतर पिकांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. फळबागांच्या नुकसानीसाठी सरकार संपूर्ण मदत देईल. खड्डे खोदण्यापासून ते रोपे देण्यापर्यंत संपूर्ण मदत शेतकऱ्यांना केली जाईल. याशिवाय मागेल त्याला शेततळे हे धोरण राबविण्यात येईल. आत्महत्याग्रस्त आणि नक्षलग्रस्त जिल्हे, कायम दुष्काळी तालुके आणि पश्चिम महाराष्ट्रातील ७७ तालुक्यांमधे ठिबक सिंचनासाठी ८० टक्के अनुदान दिले जाईल. कोकणामधे काजू विकास मंडळामार्फत काजू लागवडीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. तसेच, मराठवाड्यातील दुष्काळी स्थिती पाहता, रोजगारासाठी तेथून होणारे स्थलांतर रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. मागेल त्याला काम हे धोरण तेथे राबविण्यात येणार असल्याची माहिती क्षीरसागर यांनी दिली.
--------------------------
पुरामुळे बाधित झालेल्या शेतीचा प्राथमिक अंदाज (क्षेत्र हेक्टरमधे)
जिल्हा बाधित क्षेत्र पिके रायगड १७७५५.२० भात, आंबा व भाजीपालाठाणे २१७५.०२ भातसिंधुदूर्ग ९७९४.२० भात, भाजीपालापालघर ११४८४.३१ भात, चिकू, केळी, आंबा, नाचणी, वरईधुळे १२२३.६० कापूस, ज्वारी, मूग, उडीद,सोयाबीन,मकानाशिक २२३३४.१० भात, मूग, उडीद, कापूस, सोयाबीन, मका, बाजरी, तूर, वरई, नाचणी, भाजीपालासातारा २३११६.५३ सोयाबीन, भात, मूग, उडीद, मका, बाजरी, ऊस, ज्वारी, भाजीपालासांगली २०५७१ सोयाबीन, भुईमूग, केळी, हळद, भात, बाजरी, ऊस, ज्वारी, भाजीपालाकोल्हापूर ६८६१० भात, नाचणी, बाजरी, भुईमूग, सोयाबीन, ऊस, भाजीपालापुणे १२८९१ सोयाबीन, भात, भुईमूग, मका, भाजीपालासोलापूर १०८२०.२० ऊस, केळी, पेरु, नारळ, मका, मूग, उडीद, सोयाबीन, तूर, डाळींब, बाजरीअहमदनगर ६४४ सोयाबीन, बाजरी, मका, तूर, ऊसवर्धा ७७ कापूस, सोयाबीन, तूर, भाजीपाला