सांगली : राज्यात योग्य समन्वय नसल्यानेच कॉँग्रेसचे नुकसान झाले आहे. याबाबत आता उघडपणे व स्पष्ट बोलण्याची वेळ आली आहे. जे घडले, त्याची स्पष्ट कल्पना दिल्लीला गेल्यानंतर पक्षश्रेष्ठींना देण्यात येईल, असे माजी मंत्री पतंगराव कदम यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.मोदीलाट ओसरल्याचा आमचा समज चुकीचा ठरला. त्यातच कॉँग्रेसचा राज्यभरातील समन्वय योग्य नव्हता, असे ते म्हणाले. राज्यभरात पक्षाचे जे नुकसान झाले, त्याला मोदीलाटेसह अन्य स्थानिक कारणेही आहेत. याबाबतची चर्चा मुंबई व दिल्लीतही होईल, असे त्यांनी सांगितले. सांगली जिल्ह्यात चार ठिकाणी राष्ट्रवादीने भाजपाला छुपा पाठिंबा दिला. या गोष्टी आता लोकांसमोर येत आहेत. यापुढे राज्यात असंगाशी संग करून चालणार नाही, असे ते म्हणाले. राज्यातही राष्ट्रवादीची अशीच भूमिका आहे. लग्नाला येऊ नको म्हणत असताना कोणत्या गाडीत बसू, असे राष्ट्रवादी विचारत आहे. भाजपाने पाठिंबा मागितला नसताना देखील राष्ट्रवादीने त्यांना पाठिंबा देऊ केला. या गोष्टी ते कशासाठी करीत आहेत, याची कल्पना राज्यातील जनतेला आली आहे. त्यामुळे यापुढील काळात काँग्रेसला स्पष्ट भूमिका घेऊन पुढे जाणे भाग आहे. राष्ट्रवादीने कॉँग्रेसमध्ये विलीन व्हावे, असे मत मी मांडले होते. तसे झाले असते तर या निवडणुकीत त्यांची प्रतिष्ठा राहिली असती, असेही कदम म्हणाले.
समन्वयाअभावीच नुकसान -पतंगराव
By admin | Published: October 21, 2014 3:00 AM