नाशिक : महाराष्ट्र - गुजरात हद्दीवरील दमणगंगा-पिंजाळ-तापी लिंक प्रकल्प म्हणजे थेट ‘लिंकिंग आॅफ करप्शन’ असल्याची टीका मॅगसेसे पुरस्कारप्राप्त जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी येथे केली. गुजरातला विरोध नाही, परंतु जलतूट असलेल्या महाराष्ट्रातील नाशिक, नगर आणि मराठवाड्यालाच हे पाणी मिळाले पाहिजे, अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली आहे.महाराष्ट्र शासनाने गुजरातला पाणी देण्यासाठी यापूर्वीच करार केला असून, आता त्यातून काही पाणी महाराष्टÑाला घेण्याचा प्रयत्न राज्य सरकार करीत आहे. नद्या जोडणे म्हणजे देश तोडणे होय. नद्या जोड प्रकल्पाची या देशाला गरज नाही, असे ते म्हणाले, दमणगंगा-पिंजाळ लिंकसारखे प्रकल्प हे कंपन्यांच्या हितासाठी राबविले जातात. त्यातून केवळ नव्या शहरांना पाणी दिले जाते. त्यातून भ्रष्टाचाराची एक साखळीच तयार होत आहे. मूळ कामाच्या दहापट ठेकेदार कमवित असतात, त्यामुळे आपण ठेकेदार आणि कार्पोरेट कंपन्यांच्या हितासाठी प्रकल्प राबविणे सोडणार नाही, तोपर्यंत जलसंवर्धनाचे आणि पाण्याचे समन्यायी वाटप होऊ शकणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
‘दमणगंगा-पिंजाळ प्रकल्पात भ्रष्टाचार’ , मॅगसेसे पुरस्कारप्राप्त जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 3:34 AM