जिल्ह्यात गेल्या २४ तासांत झालेल्या अतिवृष्टीमुळे धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. खडकवासलासह ९ धरणांचे दरवाजे उघडण्यात आले असून, सर्व नद्यांना मोठे पूर आले आहेत. सर्वाधिक ४१ हजार क्युसेक्सने वीर धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. खडकवासला धरणातून ३९, ६०० , चासकमानमधून भीमा नदीपात्रात २६,४७३, तर नीरा देवघरमधून ५७०० क्युसेसने नीरा नदीत पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे नद्या दुथडी भरून वाहू लागल्या असून काही गावांचा संपर्क तुटला आहे. चासकमान : खेड व शिरूर तालुक्यास वरदान ठरलेले चासकमान धरण ९७.८६ टक्के भरले असून, खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे पाचही दरवाजे उघडून रात्री ८ नंतर भीमा नदीपात्रात २६ हजार ४७३ क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले आहे.धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात १७१३१ क्युसेक्स वेगाने आवक होत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सकाळी ११ वाजता धरणाचे दोन दरवाजे उघडून भीमा नदीपात्रात ४३५० क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात झाली. झपाट्याने वाढणाऱ्या पाणी साठ्यामुळे दुपारी २ वाजता धरणाचे पाचही दरवाजे अर्धा फुटाने उघडून भीमा नदीपात्रात ९१२५ क्युसेक्स विसर्ग करण्यात आला. भीमा नदीपात्र ९ हजार १२५ क्युसेक्स, डाव्या कालव्याद्वारे ३०० क्युसेक्स व डाव्या कालव्यास ५५० क्युसेक्स असा धरणातून एकूण ९ हजार ६७५ क्युसेक्सने विसर्ग सुरू होता, मात्र मूसळधार पाऊस सुरू असल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्याने सायंकाळी ७ नंतर विसर्ग वाढवून तो १८ हजार २१८ क्यूसेक्स करण्यात आला त्यानंतर ८ वाजता पुन्हा विसर्ग वाढवून तो २६,४७३ क्युसेक्सने पाणी सोडण्यात आल्याची माहिती सहायक अभियंता एस. जी. शहापुरे, तसेच शाखा अभियंता एस. एन. भुजबळ यांनी दिली. सावधनतेचा इशारा भीमा नदीकाठच्या नागरिक व शेतकऱ्यांना पाटबंधारे विभागाने दिला आहे. (वार्ताहर)>इंदापूर : उजनी धरणाच्या लाभ क्षेत्रात दोन दिवसांपासून दमदार पाऊस असल्याने उजनी धरणात साठ हजार क्युसेक्स क्षमतेने पाण्याचा विसर्ग सुरु झाला आहे अशी माहिती उजनी धरण व्यवस्थापन विभागाचे शाखा अभियंता बाळकृष्ण क्षीरसागर यांनी पत्रकारांना दिली.ते म्हणाले की,उजनी धरणात बंडगार्डन येथून ३० हजार ६०८, दौड येथून २५ हजार ९३३ पाण्याचा विसर्ग येत आहे.धरणाची पाणी पातळी ४८८.७३० दशघनमीटर झाली आहे. एकूण पाणी साठा १३९४.४९ मीटर आहे. उपयुक्त पाणी साठा वजा ४०८.३२ मीटर झाला आहे. टक्केवारी वजा २७ टक्के आहे. धरण उपयुक्त साठा बेरजेत येण्यासाठी पंधरा टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे. >वीरचे नऊ दरवाजे उघडलेदोन वर्षांनंतर सोडले पाणी : नीरा खोऱ्यातील दुष्काळ हटलासोमेश्वरनगर : अखेर नीरा खोऱ्यातील गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेला दुष्काळ हटला आहे. आज तब्बल दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर वीर धरणाचे नऊ दरवाजे उघडले असून, वीर धरणातून नीरा नदीत ४१ हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. गेल्या दोन दिवसांपासून नीरा खोऱ्यातील नीरा देवघर, भाटघर, वीर व गुंजवणी या चार धरणक्षेत्रामध्ये दमदार पावसाने हजेरी लावल्याने ५० ते ५५ टक्क्यांवर असलेली धरणे ८० ते ९० टक्क्यांवर गेल्याने नीरा खोऱ्यातील शेतीच्या पाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सन २०१३ ला वीर धरणामधून नीरा नदीमध्ये पाणी सोडण्यात आले होते. त्यानंतर २०१४ व १५ ला कमी प्रमाणात पाऊस झाल्याने सर्वच धरणे ७० ते ८० टक्केच भरत होती. त्यामुळे नीरा नदीला पाणी सोडण्यात आले नव्हते. आज तब्बल दोन वर्षांनंतर नीरा नदीत २१९१० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले आहे.>भोर तालुक्यातील नीरा देवघर धरणभागात एका दिवसात २२६ मिमी पाऊस झाला असून, धरण ८१.३३ टक्के भरले होते. सकाळी धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रातून ७०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले होते. मात्र, सायंकाळी ६ वाजता साठा ८७ टक्के झाल्याने धरणाच्या दोन दरवाजांमधून ५ हजार ७०० क्युसेक्सने पाणी नीरा नदीत सोडण्यात आल्याचे पाटबंधारे विभागाचे उपअभियंता विजय नलावडे यांनी सांगितले. यामुळे नीरा नदीतील पाणीपातळीत वाढ झाली असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भाटघर धरण ७३ टक्के भरले आहे. किकवी ६१, संगमनेर १७६,नसरापूर ९४, वेळू ८३, भोर ११३, भोलावडे १९२,आंबवडे १७२, निगुडघरला सर्वाधिक २२६ मि.मी पावसाची नोंद झाली.
धरणांचे दरवाजे उघडले..!
By admin | Published: August 04, 2016 1:03 AM