निमगाव सावा : निमगाव सावा (ता. जुन्नर) येथे उद्योगपती भास्कर गावडे यांनी प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे शाळाबाह्य होण्याच्या परिस्थितीत असणाऱ्या खोडद, निमगाव सावा, साकोरी, पारगाव येथील जिल्हा परिषद शाळा व विद्यालयातील एकूण सुमारे ३५ मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेतले, अशी माहिती शिवसेना विभागप्रमुख व ग्रामपंचायत सदस्य विजय थोरात, तसेच शाखाप्रमुख दादामियाँ पटेल यांनी दिली. ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील पालक दिवसभर काबाडकष्ट करूनही उदरनिर्वाह करण्याइतपत पैसे मिळत नाहीत, तर मुलांचे शिक्षण कसे करणार? त्यात त्यांचाही दोष असतोच असे नाही; परंतु ही मुले न शिकल्याने मोठेपणी उदरनिर्वाहासाठी चोऱ्या, लूटमार, दरोडे असे गैरप्रकार करतात. ही मुले शालाबाह्य होऊ नयेत, यासाठी सरकार मोठा खर्च करते; परंतु समाजसुधारणेत खारीचा वाटा म्हणून आपणही आपल्या उत्पन्नातील काही वाटा प्रत्येक वर्षी या गरीब, गरजू मुलांच्या शिक्षणावर खर्च करीत आहे. आतापर्यंत अनेक मुलांना श्क्षिणासाठी मदत केली असून, त्यांपैकी एक सध्या तलाठीपदावर कार्यरत आहे. अजून एक विद्यार्थी उपजिल्हा अधिकारीपदाच्या शर्यतीत आहे. इतर मुले चांगला कामधंदा करीत असून सुस्थितीत आहेत, असे या वेळी ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष भास्कर गाडगे यांनी सांगितले. याबाबत दत्तक घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना विचारले असता त्यांनी सांगितले, की दिवसभर काबाडकष्ट करूनही उदरनिर्वाह करण्याइतके पैसेही मिळत नाहीत आणि काम दररोज मिळतेच असे नाही.त्यामुळे पोरांना कसे शिकविणार, असा प्रश्न होता. परंतु, भास्कर गाडगे यांच्या रूपाने देवच भेटल्याचे त्यांनी सांगितले. आता आपली मुले शिक्षण घेणार असल्याने पालकांच्या चेहऱ्यावरील आनंद या प्रसंगी लपून राहत नव्हता.
दानशूरांनी घेतली ३५ मुले शिक्षणासाठी दत्तक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2016 1:08 AM