मुंबई - विधानसभेसाठी उमेदवारी मागे घेण्याच्या दिवशीच पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकरांचे जावई किशोर पवार यांनी युतीत शिवसेनेला जागा सुटली असताना बंडखोरी करत आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवली. पिशोर नाका येथील जैन कॉप्लेक्स मध्ये मेळावा घेऊन निवडणुकीत आव्हान कायम ठेवल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे शिवसेनेची अडचण वाढली आहे. तर रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव देखील कन्नडमधून अपक्ष निवडणूक लढवत आहे. त्यामुळे या दोन जावयांमध्येच सरळ लढत होण्याची शख्यता आहे.
भाजपचे डॉ.संजय गव्हाणे व जि.प. सदस्य किशोर पवार यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केले होते, डॉ. संजय गव्हाणे यांनी युतीधर्म पाळत माघारी घेतली. मंत्री बबनराव लोणीकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत भाजप पक्षाला ४१ हजाराच्या वर मते मिळाल्याने या मतदार संघावर हक्क सांगत किशोर पवार यांनी उमेदवारी कायम ठेवली.
जालना जिल्हयातील भाजपचे पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकरांचे जावई किशोर पवार व याच जिल्हयाचे केंद्रीय मंत्री माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचे जावई माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यात या उमेदवारीमुळे चुरसीची लढत पाहवयास मिळणार आहे. हर्षवर्धन जाधव या मतदार संघातून दोनदा विजयी झालेले आहेत.
किशोर पवार यांनाही संपन्न राजकीय वारसा असल्याने भाजपच्या दोन मंत्र्यांच्या जावयांमध्ये लढत पहावयास मिळणार आहे. यावेळी शिवसेनेपेक्षा दोन अपक्षांची लढत चर्चेचा विषय ठरत आहे.