नवी मुंबई : नेरूळमधील रेन अल्ट्रा लॉंज अँड रेस्टॉरंटमधील दारू पार्टीवर पोलिसांनी धाड टाकली. येथून तब्बल २६२ युवक व युवतींना ताब्यात घेतले आहे. यामधील २१७ जण अल्पवयीन आहेत. घटनास्थळावरून मोठ्याप्रमाणात मद्यसाठा हस्तगत केला आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये बार मालक सुखदेव कब्रा, व्यवस्थापक देवेंद्रसिंह मकानासिंह, डी.जे. चालविणारा सनी ठाकूर व इतर ३ जणांचा समावेश आहे. आयोजक विवेक फरार आहे. पामबिच रोडवर सारसोळे जंक्शन येथे असणाऱ्या या बारमध्ये अल्पवयीन मुलांच्या दारू पार्टीचे आयोजन केले असल्याची माहिती मनसेचे विभाग अध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी पोलिसांना दिली. या माहितीच्या आधारे पोलिस आयुक्त के. एल. प्रसाद व उपआयुक्त सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली धाड टाकली. येथे ३०० स्क्वेअर फुटच्या हॉलमध्ये तब्बल २६२ जण डान्स करत होते. यामध्ये १६३ मुले असून त्यामधील १४० अल्पवयीन आहेत. ९९ मुली असून त्यामधील तब्बल ७७ अल्पवयीन आहेत. अत्यंत छोट्या जागेत मोठ्याप्रमाणात डीजे वाजविला जात होता. याच ठिकाणी स्वयंपाकही सुरू होता. युवक-युवती मोठ्याप्रमाणात सिगारेट व दारू पित होते. पोलिसांनी घटनास्थळावरून लाखो रूपयांचे डी. जे. चे साहित्य जप्त केले आहे. याठिकाणी दारूचा मोठा साठाही हस्तगत केला आहे. सर्व दारू कर बुडवून आणलेली होती. प्रवेशिकेची ५ पुस्तके सापडली असून प्रत्येकामध्ये २७५ तिकिटांचा समावेश आहे. रोख रक्कमही आढळून आली असून ते मोजण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. सर्व मुलांना वैद्यकीय तपासणीसाठी वाशीतील महापालिकेच्या रूग्णालयात पाठविण्यात आल्याची माहिती उपआयुक्त सुरेश मेंगडे यांनी दिली. रात्री उशिरा मुलांचे पालकही पोलिस स्टेशन व रूग्णालयात जमा होवू लागले होते. (प्रतिनिधी)
नेरूळमध्ये डान्स पार्टी उधळली!
By admin | Published: July 18, 2014 2:51 AM