मुरलीधर भवार,
डोंबिवली- दांडी यात्रा करून मिठाचा सत्याग्रह करणारे, स्वदेशीचा नारा देणारे गांधीजी नव्या पिढीला पुन्हा कळावेत यासाठी, गांधी विचारांना उजाळा देण्यासाठी यासाठी दोन प्राध्यापक आणि त्यांच्या विद्यार्थ्यांने पुन्हा दांडी यात्रा काढण्याचे ठरविले आहे. ती साबरमतीतून गुरूवारी सकाळी सुरू होईल. चंगळवादी पिढीला चालण्याचे महत्त्व समजावून सांगणे हाही या यात्रेचा एक हेतू आहे. १९३० ला हा सत्याग्रह झाला. स्वदेशीचे पुरस्कर्ते, अहिंसेचा संदेश देणारे असूनही गांधीजी पाकधार्जिणे असल्याचा प्रचार आजही केला जातो. त्याविरोधात के. शिवा अय्यर हे ध्येयवेडे गांधीवादी प्राध्यापक, त्यांचे सहकारी आणि विद्यार्थ्यासोबत दांडी यात्रा करणार आहेत. ही यात्रा साबरमतीहून निघेल. ती ३ नोव्हेंबरपासून १४ नोव्हेंबरपर्यंत चालेल. अय्यर (वय ५४) हे डोंबिवलीच्या सागावला राहतात. मॉडेल कॉलेजमध्ये ते प्राध्यापक होते. स्वेच्छानिवृत्तीनंतर ते परिसरातील बेकायदा बांधकामांची प्रकरणे उघडकीस आण, सोसायटीला रस्ता मिळवून देण्याचे काम करत आहेत. उपोषण आणि पदयात्रा ही दोन हत्यारे त्यांनी उपसली. गांधीजींच्या सत्याग्रहावर त्यांचा विश्वास आहे. गतवर्षी त्यांनी साबरमती ते दांडी अशी यात्रा केली होती. आताही ते दररोज ३५ किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. हे अंतर ३९० किलोमीटरचे असले तरी पहिल्या दांडी यात्रेचा अनुभव गाठीशी असल्याने ही यात्रा कमी वेळेत पार पडेल, असा विश्वास त्यांना आहे. टाटा कन्सलटन्सीमध्ये कामाला असलेला त्यांचा विद्यार्थी रवी पांडे हाही यात्रेत सहभागी होणार आहे. शिवाय ठाण्याच्या बेडेकर कॉलेजमध्ये प्राध्यापक असलेले ओमप्रकाश सुखलानी हेही सहभागी होतील. सुखलानी यांचे कुटुंबीय फाळणीवेळी भारतात आले. त्यांच्यासाठी गांधीजी परमेश्वर आहेत. गांधीजींसोबत दांडी यात्रेत सहभागी झालेल्या इला भट (वय ८९) यांना नमस्कार करून ही यात्रा सुरू होईल.>गांधी आचरणाची गरजगांधीजीनी स्वदेशीची चळवळ सुरु केली. त्यांनी मिठाच्या सत्याग्रह केला नसता, तर आज मीठही महाग मिळाले असते. गांधीनी हरीजनांसाठी काम केले. देशवासीयांना अंगभर वस्त्र मिळत नाही म्हणून त्यांनी केवळ पंचा नेसणे पसंत केले. स्वदेशी गांधीची प्रतिमा आजही मलीन केली जाते. ते पाकधार्जिणे होते, असा अपप्रचार केला जातो. देशाला आजही गांधीच्या विचारांची आणि आचरणाची गरज आहे. तोच संदेश या यात्रेतून दिला जाईल, असे प्रा. अय्यर यांनी सांगितले. सुखवस्तू झाल्याने, प्रवासाची साधने वाढल्याने चालणे होत नाही. त्यामुळे या यात्रेतून चालण्याचा संदेश दिला जाणार आहे. रामदेवबाबा जरी स्वदेशीचा नारा देत असले, तरी खरे स्वदेशी होते, ते गांधीजी, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.