ठाणे : एक मराठा, लाख मराठा... असे फलक घेऊन तीनहातनाका ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धडकलेला मोर्चा अत्यंत शिस्तबद्ध आणि शांततेने पार पडला. मोर्चात कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा घोषणाबाजी नसल्याने पोलिसांनाही कुठेही ‘दंडुकेबाजी’ करावी लागली नाही. त्यामुळे कॉन्स्टेबलपासून ते पोलीस आयुक्तांपर्यंत सर्व पोलिसांनी या मोर्चाचे कौतुक केले.तीनहातनाक्यावर कोपरी, माजिवडा, मुलुंड चेकनाका आणि नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, अंबरनाथ, शहापूर आणि पालघर जिल्ह्यातील मराठाबांधव मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. तीनहातनाक्यापासून सुरु झालेल्या या मोर्चामध्ये सुरुवातीला विद्यार्थिनी, महिला त्यापाठोपाठ पुरुष मंडळी सहभागी झाले होते.या मोर्चाच्या बंदोबस्तासाठी पोलीस आयुक्त परमवीर सिंग, सहपोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे, गुन्हे अन्वेषण विभागाचे उपायुक्त पराग मणेरे, वागळे इस्टेट विभागाचे उपायुक्त सुनील लोखंडे आणि ठाण्याचे उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांच्यासह ३०० अधिकारी आणि दोन हजार पोलीस तसेच राज्य राखीव दलाच्या तीन कंपन्यांची जादा कुमकही तैनात करण्यात आलेली होती. (प्रतिनिधी)>पोलीस-छायाचित्रकार यांच्यात किरकोळ वादतीनहातनाक्यावरील उड्डाणपुलावरून मोर्चाचे छायाचित्रण करण्यासाठी काही छायाचित्रकारांनी पुलाच्या कठड्यावर चढण्याचा प्रयत्न केला. त्याठिकाणी एखादी दुर्घटना होऊ नये, यासाठी गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक अभिजित भुजबळ यांनी त्यांना अटकाव केला. यातूनच छायाचित्रकार आणि पोलिसांत किरकोळ वादाचा प्रकार घडला. निरीक्षक मांगले यांनी हा वाद सोडवला. मोर्चानंतर घरी परतणारे मराठाबांधव अत्यंत शिस्तीने आल्या मार्गाने परतत होते. त्यामुळे वाहतूक सुरळीत सुरू होती.
दंडुका न उगारताही लाखोंचा मोर्चा शांततेत
By admin | Published: October 17, 2016 4:14 AM