हुसेन मेमन । लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : या तालुक्यातील डेंगाचीमेट मातेरा डोंगर हे एक अदभूत पर्यटनस्थळ आहे. या परिसरात सर्वात उंच डोंगर असून, त्याच्या माथ्यावर गेल्यानंतर सभोवताली नयनरम्य दृश्य दृष्टीस पडते. तर डोंगराच्या पूर्वेस आंब्याचापाडा येथील हिवाळी नदीवरील धबधबा, गरदवाडीचा धबधबा, व जव्हार शहरातील जयविलास पॅलेस दिसतो. मातेरा डोंगर हे पर्यटनस्थळ उंचीवर असल्याने तालुक्याच्या व इतर परिसराला सुंदर मनमोहक करून टाकते. त्यामुळे अनेक पर्यटकांनी त्याला भेट द्यायला सुरवात केली आहे.तसेच पश्चिमेस माथ्यालगत डोंगराच्या मध्यभागी पंचक्रोशितील प्रसिध्द असले धार्मिकस्थळ, निसर्ग पूजक आदिवासीचे श्रध्दस्थान, शिदागनी देवीची पुरातन गुंफा नजरेस पडते. या परिसरात खोल दरी, घनदाट जंगल, धामणी डॅमचे पाणी असे सुंदर नयनरम्य दृश्य पाहायला मिळते. या पर्यटस्थळावरून विक्रमगड तालुक्याचे नयनरम्य व हिरवेगार चित्र पाहायला मिळते. तर उत्तरेस डेंगाचीमेट गाव-पाडे, डहाणू -जव्हार रस्त्यावरील वाहनांची वर्दळ दिसते. तसेच घनदाट जंगलातून येणारे पक्षांचे किलबिलाट मंत्रमुग्ध करून टाकतात. संध्याकाळच्या वेळेला मोर इतर पक्षी, प्राणी यांचे आवाज देखील मन भरुन टाकतात. हे सगळे दृश्य पर्यटकांना वेगळे वाटते. त्यामुळे डेंगाचीमेट परिसरातील मातेरा डोंगरला पर्यटनस्थळ म्हणून घोषित करावे अशी मागणी पालघर जिल्हाधिकारी व महाराष्ट्र मंत्रालय पर्यटनस्थळ विभाग यांच्याकडे स्थानिकांनी केली आहे. तसेच तेथील पर्यटनाचा विकास व्हावा यासाठी आवश्यक त्या सुविधा निर्माण केल्या जाव्यात, असेही सुचविलेले आहे.
डेंगाचीमेट मातेरा डोंगर नवे पर्यटनस्थळ
By admin | Published: July 13, 2017 3:39 AM