ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - राजकारणाचे गुन्हेगारीकरण होऊ नये असा सर्वच राजकीय पक्षांचा सूर असतो पण, प्रत्यक्षात निवडणुकीच्या रणमैदानात जिंकण्यासाठी सर्वच पक्षांकडून गुंडांना आपलेसे करुन घेतले जाते हे वास्तव आहे. सध्या शिवसेनेकडून सत्ताधारी भाजपावर गुंडांना पक्षात प्रवेश दिल्याचा आरोप करण्यात येत आहे.
वास्तविक उत्तरमुंबईतील 1 ते 18 वॉर्डमध्ये शिवसेना आणि भाजपा दोन्ही पक्षांनी प्रत्येकी पाच-पाच गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना तिकीट दिले आहे. हिंदुस्थान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार उत्तरमुंबईतील या 18 वॉर्डांमध्ये 26 गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार निवडणूक लढवत आहे. यात पाच भाजपा, पाच शिवसेना, एक काँग्रेस आणि उर्वरित 15 अपक्ष आहेत. हे सर्व वॉर्ड बोरिवली आणि दहीसर प्रभागात येतात.
अपक्ष उमेदवार सुनील गीमबालवर 2007 मध्ये हत्येच्या गुन्ह्याची नोंद झाली होती. आपली त्या प्रकरणातून सुटका झाली असे सुनीलने सांगितले. दीनेश अमबोर, विद्यार्थी सिंह या भाजपा उमेदवारांवर छेडछाडीचे गुन्हे आहेत.
मनसेमधून भाजपामध्ये आलेले विद्यमान नगरसेवक प्रकाश दरेकर यांच्यावर सर्वाधिक पाच गुन्ह्यांची नोंद आहे. विद्यमान भाजपा नगरसेवक मोहन मिठबावकर यांच्यावर तीन गुन्हे दाखल आहेत. शिवसेनेनेही बालक्रिष्ण ब्रिद, संध्या दोषी आणि राजेश कदम या गुन्हे दाखल असलेल्या उमेदवारांना तिकीट दिले आहे.