संदीप मानकर, किरण होले
अमरावती, दि. 3 - कटरा ते वैष्णोदेवी मार्गावर देशरक्षणार्थ तैनात सीआरपीएफचा जवान डोळ्यांत तेल घालून कर्तव्य बजावत असताना अकस्मात खोल दरीत कोसळला. त्यातच त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरनगरीच्या या सुपुत्राने रविवारी सायंकाळी मातृभूमिच्या रक्षणार्थ प्राणांची आहुती दिली. उरी हल्ल्यात शहीद झालेल्या विकास उर्फ पंजाब उईकेच्या स्मृतींची जखम सुकत नाही तोच जिल्ह्याने दुसऱ्या एका लढवय्या जवानाला गमावले. त्याच्या जन्मगावी हे भयंकर वृत्त धडकताच त्याच्या गावात स्मशानशांतता पसरली आहे. पण, त्या वीरमातेला मात्र अद्याप तिचा लाडका गौतम शहीद झाल्याची माहिती वृत्त लिहिस्तोवर नव्हती. काही तरी विपरीत घडलेय...हे तिला उमगले असले तरी भयाण वास्तवाशी तिचा सामना एव्हाना व्हायचा होता. दर्यापूर तालुक्यातील खल्लार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या डोंगरगावचा गौतम भीमराव इंगळे हा रहिवासी. त्याचे मूळ गाव लांडी असले तरी दोन पिढ्यांपासून त्यांचे कुटूंब डोंगरगावात वास्तव्यास आहे. देशभक्तीच्या ओढीने गौतम सात वर्षांपूर्वी सीआरपीएफमध्ये दाखल झाला. सद्यस्थितीत तो सीआरपीएफ ६ बटालियनमध्ये जम्मू काश्मिरमध्ये कार्यरत होता. सीमेवर सध्या असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे ताण वाढलेला. प्रत्येक सैनिकावर जबाबदारी वाढलेली. पण, नेटाने कर्तव्य बजावत असतानाच कटरा ते वैष्णोदेवी मार्गावरील खोल दरीत तो कोसळला. कर्तव्य बजावत असतानाच त्याने अंतिम श्वास घेतला. गौतम देशासाठी शहीद झाला.
आणि हळहळले डोंगरगाव!
अवघे १५०० लोकवस्तीचे डोंगरगाव. याच मातीत गौतम खेळला, बागडला, घडला. याच मातीने त्याला देशभक्तीची प्रेरणा दिली. तो सैन्यात दाखल झाला. पण, प्रत्येक वेळी तो सुटीत गावांत येई. गावाबद्दलचा त्याचा जिव्हाळा, आपुलकी तसूभरही कमी झाली नव्हती. सवंगड्यांना त्याच्या या स्मृती आता राहून-राहून आठवत आहेत आणि अख्खे डोंगरगाव गौतमच्या आठवणींमध्ये हळहळत असल्याचे चित्र आहे. बॉक्स ‘ती’ वीरमाता अद्यापही अनभिज्ञच दोन बहिणींचा लाडका बंधूराज गौतम. आई रत्नाबाईचा लाडका मुलगा. पित्याच्या माघारी या माऊलीने मोठ्या लाडाकोडात गौतमचे पालनपोषण केले. एकुलता एक मुलगा असूनही छातीवर दगड ठेऊन त्याला सैन्यात दाखल केले. म्हणूनच या वीरमातेला तिच्या लाडक्या गौतमच्या मृत्युची बातमी कशी सांगावी, असा प्रत्येकाला पेच पडला होता. सगळे गाव मूकपणे अश्रू ढाळत असले तरी वृत्त लिहिस्तोवर या मातेला आपल्या काळजाच्या तुकड्याच्या मृत्युची बातमी देण्यात आलेली नव्हती. पत्नीचा मूक आक्रोश! अवघ्या चार वर्षांपूर्वी गौतमचा विवाह झाला. तिचे नाव प्रियंका. पती सैन्यात असल्याने प्रियंका नागपूर येथे माहेरीच अधिककाळ राहात असते. सुट्यांमध्ये गौतम गावी आला की, ती गावी येई. पतीच्या मृत्युचा आकस्मिक धक्का कसा पचवावा, हेच तिला कळत नाही. एव्हाना ती डोंगरगावात पोहोचली असली तरी वृद्ध सासूबार्इंना सावरण्याची मोठी जबाबदारी ती पेलत आहे. पतीच्या कायमस्वरूपी विरहाची जीवघेणी जाणीव असूनही ती केवळ मूकपणे अश्रू ढाळत आहे.
मृत्यूच्या काही तासांपूर्वीच आईशी संवाद-
मृत्यूच्या काही तासांपूर्वी म्हणजे रविवार २ आॅक्टोबर रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास गौतमचा आईसोबत दूरध्वनीवरून संवाद झाला होता. रत्नाबार्इंशी झालेला तोच संवाद अखेरचा ठरला. गौतमचे शेवटचे तेच शब्द आठवून आता रत्नाबार्इंना आयुष्य काढायचे आहे. विशेष म्हणजे १५ दिवसांपूर्वीच गावी सुटीवर येऊन गेला होता. बॉक्स शौर्यगाथा सांगत असे गौतम! गावी सुटीवर आलेला गौतम आपल्या मित्रांमध्ये रमत असे. सैन्यातील शौर्यगाथा रंगवून सांगताना त्याला स्फुरण चढत असे. त्याला देशप्रेमाचे असे अनिवार भरते आल्याचे अनेकदा पाहिल्याचे त्याचे मित्र सांगतात. अशा लढवय्या गौतमच्या स्मृती सांगताना त्याचा मित्र देवधन उमाळे यांचा गळा अवरूद्ध झाला होता. ग्रापंमध्ये रोजगार सेवक म्हणून कर्तव्य बजावणाऱ्या देवधनला आपला मित्र कायमस्वरूपी गमावल्याचे दु:ख पचविणे कठीण झाले आहे.