पिंपरी : अल्प कालावधीत मोठ्या रकमेचा परतावा देण्याचे आमिष दाखविल्याने चिटफंड आणि भिशीवाल्यांनी संजय धोका नामक व्यक्तीकडे मोठ्या रकमा गुंतविल्या. परिसरातील नागरिकांकडून चिटफंडच्या माध्यमातून जमा झालेली कोट्यवधींची रक्कम घेऊन धोका याने पलायन केले. या धोकाने दिलेल्या धोक्यामुळे भोसरी परिसरातील चिटफंड आणि भिशीवाले गोत्यात आले आहेत. धोकाच्या रूपाने आलेल्या महाठगाने चिटफंडवाल्यांना आर्थिक अडचणीत आणले आहे. गोल्डमॅन दत्ता फुगे यालाही धोकाने लाखो रुपयांना गंडवले आहे. भोसरी आणि परिसरातून अनेकांना गंडा घालून तब्बल २१ कोटी रुपये घेऊन पोबारा केलेल्या धोकाच्या फसवेगिरीची मात्र शहरात चर्चा झाली नाही. चर्चा न होण्यामागील कारण म्हणजे धोकाने अनेक नामवंत, प्रतिष्ठित लोकांना लाखो रुपयांना गंडा घातला आहे. भोसरी आणि परिसर याच भागातील चिटफंड, भिशी आणि काही पतसंस्था त्याने लक्ष्य केल्या होत्या. गुंतवणूकदारांकडून विविध ठिकाणी जमा होणारा निधी धोकाच्या हवाली केला जात होता. सुरुवातीला गुंतवणूकदारांना अपेक्षेपेक्षा जादा रकमेचा परतावा देऊन त्याने विश्वास संपादन केला. चिटफंड, भिशीवाले, गुंतवणूकदारांना तुमची जमा झालेली रक्कम अन्य ठिकाणी गुंतवणूक केली असल्याचे सांगत. परंतु ही रक्कम नेमकी कोणाकडे, कोणत्या वित्तसंस्थेत गुंतवली आहे, हे सांगत नसत. धोकाकडे सुपूर्त करण्यात येणाऱ्या रकमेची कोठेही कागदोपत्री नोंद नव्हती. आर्थिक देवाणघेवाणीचा व्यवहार केवळ बोलीवर सुरू होता. विशेष म्हणजे धोकाची कोणतीही वित्तसंस्था नव्हती. भोसरी व परिसरातून सर्व बाजुंनी येणारा पैसा त्याच्याकडे जमा होत होता. त्या रकमेची तो कशी विल्हेवाट लावतो आहे, याची कोणालाच कल्पना नव्हती. (प्रतिनिधी)प्रतिष्ठित नागरिक : फसवणुकीनंतर गप्पबहुतांशी भिशी आणि चिटफंड बेकायदा असल्याने तेरी भी चूप अन मेरी भी चूप अशी त्यांची अवस्था होती. भोसरी परिसरातील चिटफंड, भिशी चालविणाऱ्यांना काहीच कायदेशीर आधार नाही, हे माहिती झाल्याने धोका चोरावर मोर बनला. ठगास, महाठग होऊन त्याने २१ कोटींसह पलायन केले. फसवणूक झालेल्यांपैकी अनेकजण प्रतिष्ठित आहेत, आपली फसवणूक झाली असे म्हणण्यास कोणी पुढे येत नाही. त्यामुळे धोकाने कोट्यवधींचा गंडा घातल्यानंतरही तो चर्चेत आला नाही.
‘धोका’चा चिटफंडवाल्यांना धोका
By admin | Published: July 21, 2016 2:00 AM