मुंबई : पश्चिमी प्रकोपाचा प्रभाव कायम असल्याने बुधवारसह गुरुवारी मध्यप्रदेश, विदर्भ, छत्तीसगडमध्ये हलका ते मध्यम, तुरळक ते काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर मध्य भारतात काही ठिकाणी दोन दिवसांनी किमान तापमान २ ते ४ अंशांनी खाली येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
विदर्भात तुरळक ठिकाणी धुके नोंदविण्यात आले आहे. विदर्भ व मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी किंचित वाढ झाली आहे.
२९ डिसेंबर रोजी मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडेल. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. ३० डिसेंबर रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
मालेगाव @ ११.८ तर मुंबई १९ अंशांवरराज्यात सर्वात कमी किमान तापमान मालेगाव येथे ११.८ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले आहे. तर पुणे, महाबळेश्वर, मालेगाव, नाशिक, औरंगाबाद, बीड या शहरांचे किमान तापमान १४ अंशाखाली नोंदविण्यात आले असून, मुंबईचे किमान तापमान १९ अंश नोंदविण्यात आले आहे.
२९ डिसेंबर रोजी औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे.- कृष्णानंद होसाळीकर, वरिष्ठ शास्त्रज्ञ, भारतीय हवामान शास्त्र विभाग