अजित मांडके, ठाणेनौपाड्यातील कृष्ण निवास इमारत दुर्घटना घडल्यानंतर पालिका आयुक्तांनी धोकादायक, अतिधोकादायक इमारतींसंदर्भाात मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली होती. त्यानुसार, मालक आणि भोगवटादार यांचे सर्व कायदेशीर हक्क अबाधित राहतील, याची काळजी घेतली जाणार होती. याचाच एक भाग म्हणून ज्या अतिधोकादायक अथवा धोकादायक इमारतींमध्ये मालक आणि भोगवटादार यांच्यात समझोता झाला नसेल तर त्या इमारती न पाडता त्या केवळ सील करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यानुसार, यासंदर्भातील कार्यादेश काढण्याचेही पालिकेने निश्चित केले आहे. ४ आॅगस्ट २०१५ ला नौपाड्यातील कृष्ण निवास इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १२ जणांचा बळी जाऊन ७ जण जखमी झाले होते. धोकादायक इमारतींच्या यादीतही नसलेली ही इमारत कशी पडली, याबाबतचे अनेक तर्कवितर्क लावले गेले आहेत, परंतु मालक आणि भोगवटादार यांच्यात इमारतीच्या पुनर्बांधणीवरून मतभेद असल्याची माहिती यानिमित्ताने पुढे आली होती. दरम्यान, या दुर्घटनेनंतर महापालिकेने पुन्हा शहरातील अतिधोकादायक, धोकादायक इमारतींचा सर्व्हे सुरू केला असून १५ जानेवारीपर्यंत तो जाहीर केला जाणार आहे. तसेच शहरातील २ हजार ४४६ धोकादायक इमारतींना नोटीस बजावल्या आहेत. याशिवाय, भविष्यात अशी घटना घडू नये अथवा घडल्यास काय करता येऊ शकते, यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी धोकादायक, अतिधोकादायक इमारतींसंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. यामध्ये इमारतींचा सर्व्हे करणे, स्ट्रक्चरल आॅडिट करून ज्या इमारती दुरुस्तीयोग्य असतील, त्या दुरुस्त करण्याची परवानगी देणे, इमारत तोडण्याची कारवाई करताना मालक, भोगवटादार यांचे सर्व कायदेशीर हक्क अबाधित राहतील, याबाबतची स्पष्टता ठेवणे आदी प्रमुख बाबींचा यात समावेश आहे.
धोकादायक इमारती सील होणार
By admin | Published: October 17, 2015 3:12 AM