आंबेठाण : बांधकाम व्यावसायासाठी आणि औद्योगिक विभागात वापरले जाणारे सिमेंटचे रेडीमिक्स बांधकाम साहित्य भर वर्दळीच्या रस्त्याला टाकून दिले जात असल्याने ते प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहे. अनेक ठिकाणी तर ते रस्त्यालगतच्या ओढ्यात टाकून दिले जात असल्याने गटाराचे पाणी रस्त्यावरून धावत आहे.सध्या चाकण परिसरात मोठ्या प्रमाणात कारखानदारी उभी राहत आहे. त्याचप्रमाणे या परिसराचे वाढते नागरीकरण पाहता, या परिसरात बांधकाम व्यावसायिक सक्रिय झाले आहेत. अशा ठिकाणी बांधकाम करताना सिमेंट, खडी असे मिक्स केलेले बांधकाम साहित्य वापरले जाते. यासाठी रेडीमिक्स प्लांट उभारला जात असून, तेथून हे बांधकाम साहित्य वाहतूक करून अन्य ठिकाणी वापरले जात आहे. बहुतांश वेळा हे बांधकाम साहित्य पूर्णपणे वापरले जात नाही. अशा वेळी गाडीत शिल्लक असणारे हे मटेरियल वाहनचालक रस्त्याच्या कडेला अथवा ओढ्यात टाकून देतात. त्यामुळे रस्त्यातच सिमेंटचे ढीग तयार झाले आहेत. त्याचा परिणाम वाहतुकीवर होत असून, त्यामुळे अपघात होत आहेत. असे साहित्य टाकणाऱ्यांच्या कृत्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वेळा असे रेडीमिक्सचे मटेरियल डांबरी रस्त्यालगत ओतले जाते. याचे प्रमाण हायवेच्या कडेला जास्त आहे. हे मटेरियल अगदी साईडपट्ट्यांवर टाकले जात असल्याने ते वाहतुकीसाठी अडचणीचे ठरते. काही ठिकाणी तर साईडपट्टी सोडून डांबरी रस्त्यावर हे मटेरियल ओतले जात आहे. याशिवाय, अनेक वेळा रस्त्याच्या कडेला असणाऱ्या गटारात हे मटेरियल ओतले जात असून, त्यामुळे गटारातून पाणीच वाहणे बंद झाले आहे. अनेक ठिकाणी तर रस्त्याच्या कडेला असणाऱ्या मोऱ्यांच्या तोंडाशी हे साहित्य ओतले जात आहे. त्यामुळे पाणी मोऱ्यांतून वाहणे बंद झाले असून, ते रस्त्यावरून वाहत आहे.रस्त्यालगत असे रेडीमिक्स मटेरियल टाकले जात असल्याने वर्दळीच्या रस्त्यावर वाहतुकीला अडचण होत असून, त्यामुळे अपघात होत आहेत. तसेच, भविष्यात मोठी दुर्घटना होऊ शकते, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे अशा रेडीमिक्स मटेरियल टाकणाऱ्यांवर प्रशासनाने कडक कारवाई करावी, अशी मागणी प्रवासी नागरिकांकडून केली जात आहे.(वार्ताहर)
धोकादायक रेडीमिक्स रस्त्यावर
By admin | Published: October 20, 2016 1:31 AM