सेनेशी जवळीक : शिवशक्ती-भीमशक्ती मजबूत करण्याचा निर्धार
मुंबई : रामदास आठवले यांच्यावर शिवसेनेने सोमवारी सडकून टीका केली तर सायंकाळी रिपाइंचे नेते अजरुन डांगळे हे शिवशक्तीबरोबर भीमशक्ती मजबूत करण्याकरिता मातोश्रीला जाऊन मिळाले.
भाजपासोबत जाण्याचा आठवले यांनी निर्णय घेतल्यामुळे शिवसेनेने आपल्या मुखपत्रतून आठवले यांच्यावर टीकेची झोड उठवली. शिवशक्ती व भीमशक्ती हे स्वप्न पूर्ण करायचे तर रिपाइंने शिवसेनेबरोबर राहायला हवे होते. परंतु दिल्लीश्वरांनी मंत्रीपदाचे गाजर दाखवल्याने आठवले यांनी आंबेडकरी जनतेशी सौदा केला. आठवले यांच्या पायाशी आज जे कमळाच्या पाकळ्य़ा पसरत आहेत तेच आठवले यांना पाहून दरवाजे बंद करीत होते. आठवले यांना अमित शहा यांनी मंत्रीपदाचा गूळ लावला असून अशा गोंधळी नेतृत्वामुळे आंबेडकरी चळवळीची वाट लागली, अशा शब्दांत शिवसेनेने टीका केली.
आठवले यांना राज्यसभा मिळवून देण्याकरिता शिवसेनेने भाजपाला शिफारस केली, असा दावाही शिवसेनेने केला. रविवारी राज ठाकरे यांनी आठवले यांना शिवसेनेने दिलेल्या उपमुख्यमंत्रीपदाच्या ऑफरची खिल्ली उडवली होती.
या टीकेचा समाचार घेताना आठवले म्हणाले की, मंत्रीपदाकरिता नव्हे तर केंद्रात भाजपाची सत्ता असल्याने त्यांच्यासोबत गेलो. शिवसेनेच्या टीकेला आपण प्रत्युत्तर देणार नाही. निवडणुकीनंतर शिवसेना व भाजपाला पुन्हा एकत्र आणण्याकरिता प्रयत्न करणार आहे. राज ठाकरे यांच्या टीकेचा मात्र आठवले यांनी समाचार घेतला. मला शिवसेनेने उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याने राज यांना हसू येते. परंतु राज यांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पडतात हे ऐकून मलाही हसू येते.
आठवले यांनी शिवसेनेच्या टीकेला उत्तर दिले नसले तरी अंधेरी व अन्य काही ठिकाणी रिपाइंच्या कार्यकत्र्यानी शिवसेनेच्या मुखपत्रची होळी केली. (विशेष प्रतिनिधी)
रिपाइंचे नेते व प्रवक्ते अजरुन डांगळे यांनी सोमवारी सायंकाळी मातोश्रीवर जाऊन शिवशक्ती-भीमशक्ती मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. आपण रिपाइं सोडलेली नाही. मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न भीमशक्ती शिवसेनेबरोबर राहिली तर पूर्ण होईल, असे ते म्हणाले.